ठाणे : ठाणे जिल्हयातील धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प साकारला जात आहे. सध्या प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरू असून मे २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. गुरूवारी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला. या ट्रॉलीमुळे भाविकांना तसेच पर्यटकांना अवघ्या दहा मिनिटांत गडावर पोहचता येणार आहे. त्यामुळे मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
कल्याणपासून पंधरा किलोमीटर अंतरावर मलंगगड आहे. मलंगगड परिसरास शासनाने पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागांतून अनेक भाविक, विविध जाती, धर्माचे नागरिक नियमित येत असतात. मलंगगडावर जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतराची उभी वळणाची पायवाट आहे. मलंगवाडी पायथ्यापासून गडावरील समाधी स्थळापर्यंत पोहचण्यासाठी पायी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. गडावरील दुकानदार, रहिवासी आणि वर्षभर गडाला भेट देणारे भाविकांना १३६० फूट उंच डोंगर गाठण्यासाठी २५०० पायऱ्या आणि पाच किलोमीटरचा वळणांचा धोकादायक प्रवास करत गड चढावा लागतो. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने मलंगगडावरील खडतर मार्गाला पर्याय म्हणून या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प २०१२ साली सुरू कऱण्यात आला. मे सुप्रीम सुयोग या कंपनीला बांधा- वापरा- हस्तांतरीत करा या तत्वावर हे काम देण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून याची प्रकल्पाची रखडपट्टी सुरू होती. मात्र आता या कामाला चांगलाच वेग आला आहे. फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे गडावर पोहोचण्यासाठी चढाव्या लागणाऱ्या अडीच हजार पायऱ्यांची कसरत थांबणार आहे.
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विलास कांबळे यांनी गुरूवारी गडावर जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत, प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. गडावर दीडशे कुशल व अकुशल कामगार काम करीत आहेत. रेल्वे रूळ, ट्रॉली आदी कामे सुरू आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार लेन काँक्रीट रस्ता करण्यात आला आहे, त्या सर्व कामांसंदर्भात त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. मे २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी कंपनीने न्यायालयात सांगितले आहे त्यानुसार अधिक्षक अभियंता कांबळे यांनी कंत्राटार कंपनी आणि अधिका-यांना सूचना करीत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकारी अभियंता शंकरराव तोटावार, प्रशांतकुमार मानकर, उपविभागीय अभियंता भाऊराव पतंगराव, कनिष्ठ अभियंता तसेच सुप्रिम सुयोग कंपनीतर्फे एस. लातुरे, झेड शेख, आर. के. सरोते, ए. जी. कोडे आदी उपस्थित होते.
फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यात आला. सध्या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू असून, ट्रॉलीचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दीडशे कामगार काम करीत आहेत. अॅप्रोच रस्त्याचे काम चार लेन कॉंक्रिटचे दुभाजकासह ८०० मीटर लांबीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दहा मिनिटात गडावर पोहचता येणार आहे. तसेच या ट्रॉली सिस्टीममुळे पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. ( विलास कांबळे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे )