डोंबिवली दि.24 जुलै : मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आमदार चव्हाण यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. रस्त्यांसाठीचे १५ कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. आमदार चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवून तातडीने रस्ते दुरुस्ती करा नाहीतर हेच रस्त्यावर पडलेले सुटे दगड नागरिकांच्या हातात असतील आणि ते एक दिवस महापालिकेच्या दिशेने भिरकावले जातील असा इशाराच प्रशासनाला दिलाय.
आमदार रविंद चव्हाण यांच पत्र
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. याबाबत आपल्याला माहित असेलच पण आपल्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कधी होईल आणि ते स्वतःहून उपाययोजना करतील याची आजपर्यंत वाट पाहत होते. माझा अपेक्षाभंग झाला नाही कारण ते आपणहून हे काम करतील अशी माझी अपेक्षाच नव्हती त्यांनी ते केलेही नाही. यावरून आपले अधिकारी आणि प्रशासक म्हणून आपण पुन्हा एका नगर सुविधा क्षेत्रात नापास झाला आहात.
पावसाळ्यापूर्वी खड्डे का भरले नाही
महापालिका क्षेत्रात पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर पडणारे खड्डे प्रशासनास चांगलाच परिचयाचा आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध असते. मास्टेक कार्पेटसारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना आणि खड्ड्यांसाठी बजेट प्रोव्हिजन असताना पावसाळ्यापूर्वी निविदा काढून खड्डे का भरले नाहीत. रस्त्यांची झालेली चाळण यासाठी आपले सुस्त प्रशासन आणि बेदरकार वृत्ती जबाबदार आहे असा आरोप चव्हाण यांनी केलाय.
कोपर पुलाचे रडगाणं ..
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला करणे अत्यावश्यक झाले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. कोपर पुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी व्हावी. संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरज आहे.
संवेदनाहीन आणि मुर्दाड यंत्रणा
खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक असते. यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालक गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरिता महापालिका प्रशासन दोषी आहेच पण दुर्दैव असे की झालेल्या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध घेत नाही एवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झालेली आहे. डोंबिवली कल्याणकर नागरिकांचा अंत पाहू नका व लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करा नाहीतर हेच रस्त्यावर पडलेले सुटे दगड नागरिकांच्या हातात असतील आणि ते एक दिवस महापालिकेच्या दिशेने भिरकावले जातील. पालिकेच्या नाकर्तेपणामुळे तो दिवसही दूर नाही. अशा तिखट शब्दात आमदार चव्हाण यांनी पालिका प्रशासनाला खडसावले आहे.
( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Likdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )