डोंबिवली, दि.23 : गोपाळकाला आणि गणेशोत्सव सण तोंडावर येवून ठेपले असतानाही कल्याण- डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील खड्डे हे जैसे थे आहेत. गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे हे डांबरीकरण करून भरले जातील, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते आहे.मात्र कंत्राटदार केवळ खडी व मातीचा भराव टाकून काही खड्डे बुजविले जात असून उर्वरित खड्डे तसेच असल्याचे चित्र कल्याण व डोंबिवलीत अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची स्थिती ही खड्डे पडून दयनीय झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. खड्डयांवरून प्रशासनावर टीका केली जात असताना पालिकेचे अधिकारी रस्त्यांची स्थिती सुधारण्यात अपयशी ठरले आहेत का ? असा सवाल करदात्या नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त, शहर अभियंता, अधिकारी यांनी यापूर्वी रस्त्यावरील खड्डयांची पाहणी केली आहे. खड्डे योग्य पद्धतीने न भरल्यास किंवा काम दर्जेदार न केल्यास कंत्राटदारांवर कारवाई करू, अशा घोषणा केल्या गेल्या. मात्र ही कारवाई कुठेही झालेली दिसून आली नाही. त्यामुळे शहरातील खड्डे अजूनही जैसे थे आहेत.
महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड रस्त्यांची पाहणी करताना येत्या काही दिवसात शहरातील डांबरीकरणाने खड्डे भरून रस्ते सुस्थितीत केले जातील, असे आश्वासन दिले होते.मात्र गोपाळकाला आणि गणेशोत्सव सण काही दिवसांवर आले असतानाही रस्त्यांची स्थिती सुधारलेली नसून उलट अजून खराब झाली आहे. कंत्राटदार डांबरीकरण करण्याऐवजी माती व खडी टाकून खड्डे भरत असून वाहनांच्या वर्दळीमुळे अवघ्या काही तासात ही खडी इतरत्र पसरून खड्डे उघडे पडत आहेत. उलट या खडीमुळे दुचाकी घसरणे, धूळ उडणे या समस्या उद्भवत आहेत.कंत्राटदार मनमानी पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत आहेत. एका रस्त्यावरील सर्व खड्डे न भरता अर्धवट कामे करण्यात येत आहेत. केवळ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खड्डे डांबरने भरले गेले मात्र इतर खड्डे खडी टाकून भरण्यात येत आहेत.