कल्याण : कल्याणात चाकूचा धाक दाखवून १६ विद्यार्थ्याकडील मोबाईल फोन हिसकावल्याची घटना घडली आहे तर दुस-या घटनेत एका ७० वर्षीय वृध्देकडील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेल्याच्या दोन वेगवेगळया घटना शहरात घडल्या आहेत. कल्याण डोंबिवली शहरात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असून चोरटयांकडून विद्यार्थी आणि वृध्दांना लक्ष्य केले जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात असलेल्या साई प्लाझा सोसायटीत राहणाऱ्या ॲरीक जॉन अँथोनी या १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी तिघा लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा विद्यार्थी शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बिर्ला कॉलेज रोडने शंखेश्वर सोसायटी समोरून खडकपाडा सर्कलकडे पायी जात होता. इतक्यात तीन अनोळखी इसमांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येऊन ॲरीकला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल फोन व एअर पॉड्स खेचून पोबारा केला. याच दरम्यान ॲरीक याने कडाडून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र लुटारूंकडील चाकू लागल्याने त्याच्या उजव्या हाताचे मधल्या बोटास जखम झाली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश दळवी अधिक तपास करत आहेत.

कल्याणात आजीला लुटले

कल्याण : पूर्वेकडे असलेल्या नाना पावशे चौकातील लक्ष्मी चाळीत राहणाऱ्या गीताबाई ज्ञानबा सरगड (७०) यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी दोघा अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आजी गीताबाई या शुक्रवारी दुपारी पावणेदोन च्या सुमारास पूना लिंक रोडने पायी जात होत्या. याच दरम्यान दोघा अनोळखी इसमांनी आजींना गाठले. ओळख असल्याचा बहाणा करत यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून आजींकडील ३८ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर आजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी हवा. भगवान सांगळे आणि त्यांचे सहकारी फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.

पतीची आत्महत्या पत्नीसह तिच्या बहिणीवर गुन्हा दाखल

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या दावडी गावातील शिवशक्ती नगरमध्ये शाम यादव चाळीत राहणारे सुशीलकुमार त्रिभुवननाथ मिश्रा ( ५८) यांच्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी पूजा सचिनकुमार मिश्रा (२७) आणि तिची बहीण सविता उपाध्याय (४०, दोघी रा. एकदंत अपार्टमेंट, शिवशक्ती नगर, दावडी गाव) या दोघींच्या विरोधात भादंवि कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सुशीलकुमार मिश्रा हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. त्यांचा मुलगा सचिनकुमार याने २२ ऑक्टोबरच्या रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 या कालावधी दरम्यान विषारी औषध खाऊन आत्महत्या केली. आपला मुलगा सचिनकुमार याची पत्नी पुजा मिश्रा ही अजय यादव, हरिष आणि आझाद प्लंबर या तिघांशी नेहमी फोनवर बोलत असे. तिचे या अनैतिक संबंध असावेत, असा सचिनकुमार याला संशय होता. त्याने हा सगळा प्रकार आपणास सांगितला होता. मात्र या संदर्भात जाब विचारल्यावर मुलगा सचिनकुमार आणि त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. तर पूजाची बहिण बबिता उपाध्याय ही सचिनकुमार याला हरिषच्या नादाला लागू नको, तो तुला घरात येऊन मारील, तुला उचलून नेईल, अशी फोनवरुन धमकी देत असे. सततच्या त्रासाला कंटाळून मानसिक संतुलन ढासळलेल्या सचिनकुमार याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने उंदीर मारण्याचे रेटॉल हे विषारी औषध पिवून आत्महत्या केली. मुलगा सचिनकुमार याला मानसीक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सुशीलकुमार मिश्रा यांनी त्यांच्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी सपोनि ज्ञानोबा सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

डोंबिवली : खोणी-तळोजा रोडला असलेल्या पागड्याचा पाड्या समोरील ब्रिजजवळ शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात घडला. पनवेल तालुक्यातील विचूंबे गावात असलेल्या साई इच्छा पार्क सोसायटीत राहणारा स्वप्निल गजानन साळवे (२३) या जखमी तरूणाच्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी बेदरकार कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्वप्निल हा त्याचा मोठा भाऊ अमोल ( २८) असे दोघेजण त्यांच्या एम एच 46/बी वाय/6053 क्रमांकाच्या दुचाकीवरून नेरळहून पनवेलकडे घरी निघाले होते. खोणी-तळोजा रोडला असलेल्या पागड्याचा पाड्या समोरील ब्रिजजवळ येताच एम एच 43/बी जी/8221 क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने साळवे बंधूंच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोल साळवे हा जागीच ठार झाला. तर स्वप्निल यालाही जबर दुखापत झाली. अमोलच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालकाने जखमी स्वप्निल याला दवा-उपचारांसाठी घेऊन न जाता, तसेच अपघाताची पोलिसांना खबर न देता घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सपोनि अभिजित पाटील अधिक तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *