दीपेश म्हात्रे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर दिला राजीनामा
डोंबिवली, ता. 23 : महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल सर्वत्र वाजत असतानाच बुधवारी अचानक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्वात ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे .पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना आयत्यावेळी पक्षात घेऊन डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने सदानंद थरवळ यांनी हा राजीनामा दिला आहे.
निष्ठावान, पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांवर वेळोवेळी अन्याय करून, आयात उमेदवारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवाऱ्या देण्यात येत असतील तर निष्ठावान शिवसैनिकांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करत सदानंद थरवळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.
२०१४ मध्ये डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविण्याचा आपला हक्क डावलून त्यावेळी एका तरूणाला उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी पक्षप्रमुख म्हणून त्या तरूणाला उमेदवारी देताना झालेली चूक आपण नंतर मान्य केलीत, असे थरवळ यांनी उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मागील ४४ वर्ष शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, जिल्हाप्रमुख आनंद दिघे, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटना वाढीसाठी आपण नेहमीच महत्वाची भूमिका घेतली.या काळात इतर पक्षांकडून विविध प्रकारची प्रलोभने येऊनही आम्ही कधी आमची निष्ठा सोडली नाही. त्या निष्ठेची आता कदर होत नसेल आणि सत्ता तेथे उडी घेणाऱ्या दलबदलूंना पायघड्या घालून त्यांच्या विजयासाठी निष्ठावान शिवसैनिकांना जुंपण्यात येत असेल तर शिवसेनाप्रमुख, जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा निष्ठावान शिवसैनिक ते कदापी सहन करणार नाही. त्यामुळे आपण शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे थरवळ यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.तसेच आयुष्यात अशी वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते, अशी खंत थरवळ यांनी व्यक्त केली आहे.
हेच का निष्ठेचे फळ??