कल्याण : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी एका रिक्षाचालकाने ३२ वर्षीय अनिल सदाशिव मुजमळे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच उपचार मिळाल्याने हल्ल्यातून अनिल मुजमळे हा बचावला असून हल्लेखोर अद्याप हाती लागला नसला तरी महात्मा फुले चौक पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.
   

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील इंदिरानगरमध्ये राहणारा रिक्षाचालक रमेश ससाणे आणि अनिल मुजमाळे यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते. त्याचा बदला घेण्याच्या ईर्षेने पेटलेल्या आरोपी रिक्षाचालक रमेश याने संधी साधून बुधवारी रात्री अनिलला रस्त्यात गाठले. सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अनिलच्या मानेवर वार केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे बेसावध असलेला अनिल या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला पाहताच हल्लेखोर रिक्षाचालक रमेश ससाणे याने तेथून पळ काढला. याच दरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या अनिलला परिसरातील रहिवाशांनी उचलून जवळच्या रूग्णालयात दाखल केले. एकीकडे वेळीच उपचार सुरू केल्याने जीवघेण्या हल्ल्यातून अनिल बचावला. तर दुसरीकडे जखमी अनिलचा भाऊ सुनील मुजमाळे याच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!