डोंबिवली : गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेने मोबाईलसह वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दुकलीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या दुकलीने भंगार दुकानात काम करणाऱ्या मजुरांकडील मोबाईल आणि वाहनांच्या बॅटऱ्या चोरून त्या विकण्याचा प्रयत्न केला असतानाच गुन्हे शाखेने झडप घालून त्यांना अटक केली. अनुराग सुनिल मंडराई (२०, रा. संत रोहिदारस बिल्डींग, वीर सावरकर रोड, डोंबिवली-पूर्व) आणि इरफान बाबू शेख (२२, रा. प्रमिता बिल्डींग, स्मशानभुमी जवळ, गोलवली गाव, डोंबिवली-पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकदत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. दोन इसम चोरीचे मोबाईल व वाहनातून चोरलेली बॅटरी विक्री करण्यासाठी कल्याण-शिळ रोडला असलेल्या कोळेगाव येथे येणार असल्याचे कळताच कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवा. विश्वास माने, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, उमेश जाधव, सतिश सोनावणे यांनी सापळा लावला. या सापळ्यात अनुराग मंडराई आणि इरफान शेख हे दोघेही अलगद अडकले. चौकशी दरम्यान गुन्हे शाखेने या दोघांकडून ५० हजार १०० रूपये किमंतीचे ५ मोबाईल आणि तीन चाकी वाहनाची बॅटरी असा मुद्देमाल हस्तगत केला.
यातील इरफान शेख याच्यावर मानपाडा, रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात घरफोड्यांचे १२, तर अनुराग मंडराई याच्यावर मानपाडा, रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात घरफोड्यांचे ५ गुन्हे दाखल आहेत. या दोघा चोरट्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!