कल्याण : परिमंडळ 3 मधील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेने एका सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून आतापर्यंत चोरीच्या ३ ऑटोरिक्षा हस्तगत करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितले.

सरत्या वर्षाला निरोप देताना कुठेही कायदा शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, याकरिता ऑपरेशन ऑल आऊट अभियानांतर्गत सर्व पोलिस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण शाखांना उपयुक्त सूचना दिल्या होत्या. या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात गस्त घालत आहेत. गस्तीदरम्यान एकजण कल्याण-शिळ महामार्गावरील  काटई नाक्यावर थांबला असल्याची माहिती पोशि गोरक्ष शेकडे याला मिळाली होती. विशेष म्हणजे क्रमांकात खाडाखोड केलेल्या रिक्षासह सदर इसम कुणाची तरी वाट पाहत थांबला असल्याची पक्की खबर मिळताच सपोनि संदिप चव्हाण, पोउनि संजय माळी, हवा. विश्वास माने, हवा. प्रशांत वानखेडे, हवा. अनुपकामत, पोना दिपक महाजन, पोशि गोरक्ष शेकडे, पोशि गुरूनाथ जरग, पोशि मिथुन राठोड या पथकाने तात्काळ काटई नाक्यावर सापळा लावला. या सापळ्यात दिनेश जयवंत शिंगोळे (31, रा. समर्थ कृपा चाळ, भालगाव ता. अंबरनाथ) हा बदमाश अलगद अडकला. 

चौकशी दरम्यान त्याच्याकडून मोबाईलसह मुंब्रा आणि मुंबईतील पंतनगर भागातून चोरलेल्या ३ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या. मूळ क्रमांकात खाडाखोड करून त्याजागी अन्य क्रमांक टाकून चोरलेल्या रिक्षा विक्री करण्याचा फंडा वापरणाऱ्या या चोरट्याकडून अशा प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून गुन्हे अन्वेषण शाखेने त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!