बिबट्याचे आणि वाघाचे कातडं हस्तगत : दोघांना अटक ;
कल्याण क्राइम ब्रँचची कारवाई
डोंबिवली- बिबट्याचे आणि वाघाचे कातडं विकण्यासाठी आलेल्या दोघांना कल्याण क्राईम ब्रँचने अटक केली. विशाल धनराज व सचिन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे असून ते रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एक बिबट्याची व वाघसदृश्य प्राण्याची कातडी जप्त केली असून त्याची किंमत सुमारे १० लाखांच्या घरात आहे अशी माहिती कल्याण क्राईम ब्रँचचे प्रमुख संजीव जॉन यांनी दिली.
बदलापूर पाईप लाईन रोड येथील समाधान हॉटेल नजीक हे दोघे बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग कल्याण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यासह याठिकाणी सापळा लावला होता. यावेळी दोघेजण संशयितरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंग झडती घेतली असता. बिबट्याची व वाघसदृश्य प्राण्याची कातडी आढळून आली. या दोघांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
**