कल्याण/ प्रतिनिधी : जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील शास्त्रज्ञाने कल्याणच्या केम्ब्रिआ शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जॉर्ज सालझार असं या ‘नासा’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञाचे नाव असून त्यांनी स्पेस टेक्नॉलॉजी (अंतराळ तंत्रज्ञान) या अत्यंत किचकट विषयाचे विविध पैलू अत्यंत सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले. कल्याणकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच पुस्तकंबाह्य शिक्षणासाठी कल्याणातील केम्ब्रिआ इंटरनॅशनल ही शाळा सुप्रसिद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगातील अंतराळ क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘नासा’तील (नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनीस्ट्रेशन) शास्त्रज्ञाचे वेबिनारद्वारे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सायन्स आणि इंजिनिअरिंग या दोन्हींमध्ये एक पुसटशी रेषा आहे. सायन्सद्वारे आपल्याला निसर्ग समजून घेण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे जॉर्ज सालझार यांनी सांगितले. तब्बल 2 तास चाललेल्या या कार्यक्रमात जॉर्ज सालझार यांनी स्पेस टेक्नॉलॉजी, त्यामधील सायन्स-गणित आणि खगोलशास्त्र विषयांचे अनन्यसाधारण महत्व, अंतराळ मोहीमेसाठी केली जाणारी पूर्व तयारी, अभ्यास, ठोकताळे, अमेरिकेची चंद्रावरची ऐतिहासिक अपोलो मोहीम, पूर्वीचे आणि आताचे अंतराळ तंत्रज्ञान, कम्युनिकेशन सिस्टीम, सूर्यमाला, हबल दुर्बिण, सूर्यमाला यांसारख्या अनेक महत्वपूर्ण आणि छोट्या छोट्या गोष्टीची सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनीही सालझार यांना अंतराळ, ब्लॅक होल्स, टाईम मशिन्स, मंगळ ग्रह, पृथ्वीवरील आणि अंतराळातील वेळांमध्ये असणारा फरक, रॉकेट तंत्रज्ञान, गुरुत्वाकर्षणाचा शरिरावर होणारा परिणाम यांसारखे अनेक प्रश्न विचारत अंतराळाबद्दल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या कुतुहलाला वाट मोकळी करून दिली.
मुलांना प्रश्न पडावेत हाच या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य हेतू होता मुलांना चांगले प्रश्न पडले की त्याची उत्तरंही चांगलीच मिळतात. ‘कुतूहल ही ज्ञानार्जनाची जननी’ असल्याचे बोलले जातं आणि आम्ही यालाच प्रमाण मानून विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. — बिपीन पोटे, सीएमडी पोटे ग्रुप आणि केम्ब्रिआ शाळेचे प्रमुख .