- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक
ठाणे, दि.११ : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये अशी मनोकामना असून ही लाट आलीच तर न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज येथे केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल न्यायमूर्ती ओक यांचा ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, जिल्हा न्यायाधीश ब्रम्हे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष गजानन चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी न्यायमूर्ती ओक यांनी ठाणे जिल्हा न्यायालयापासून सुरू केलेली वकिली ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या प्रवासातील आठवणी नमूद केल्या. १९८३ मध्ये वकिली सुरू करताना घरातून आजोबा, वडील यांच्याकडून मिळालेल्या वकिलीचा वारसा आणि कायद्याच्या ज्ञानाचा कित्ता गिरवल्याचे त्यांनी सांगितले. केवळ सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या ठिकाणीच नाही तर तालुक्याच्या ठिकाणी देखील लीगल टॅलेंट आढळून येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. न्यायमूर्ती ओक यांनी यावेळी वडील श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती विजय टिपणीस, प्रभाकर पाटील या तिन्ही गुरूंचे स्मरण करीत अनुभव कथन केले. जिल्हा न्यायालयातील वकील ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. ओक यांच्या प्रवासाचा तरुण वकिलांनी जरूर अभ्यास करावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन . पानसरे यांनी यावेळी केले.
न्यायमूर्ती ओक यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला सव्वाशे वर्षांनी हा बहुमान मिळाल्याचे चव्हाण, कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी न्यायमूर्ती ओक यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन न्यायमूर्ती ओक यांचे स्वागत केले. कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, ज्येष्ठ वकील आदी मान्यवर उपस्थित होते.