मुंबई : मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांच जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने त्याच मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवार दि २० जूलै) मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईला झोडून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. सकाळी मुबंईकडे जाणार्या आणि संध्याकाळी मुंबईहून येणा-या लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमण्यांना कामावरून घरी पोहचण्यास उशिर होत आहे. तर लोकला तोबा गर्दी झाली आहे. संध्याकाळी चारवाजेपर्यंत मुंबईहून डोंबिवलीपर्यंत लोकल सोडण्यात येत होत्या. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झालीय.
या सर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी उद्या (गुरुवारी) मुंबईसह ठाणे, रायगड पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याच्या सुचना हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.