डोंबिवली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्याण डोंबिवलीतील कार्यक्रमात मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी मराठा आरक्षण कधी देणार असा सवाल करीत गोंधळ घातला. दरम्यान मराठा कार्यकर्ते प्रसिध्दी माध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच भाजप कार्यकत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा डोंबिवलीतील पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असून, संबधित भाजपा कार्यकत्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हयातील पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी आणि रविवारी भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौ-याच्यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. कल्याणमध्ये मराठा समाजाच्या बांधवांनी बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवित निषेध व्यक्त केला तर डोंबिवलीतही मराठा बांधव शिवाजी पाटील यांनी घोषणाबाजी केली यावेळी बावनकुळे यांनी पाटील यांना मंचावर बोलावले. त्यानंतर पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांना भाजपच्या कार्यकत्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. भाजपच्या कार्यकत्यांनी पाटील यांनाही प्रतिक्रिया देण्यापासून मज्जाव करीत त्याला बाजूला घेऊन गेले. पत्रकारांना झालेली धक्काबुक्की आणि शिवीगाळ याचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला. भाजप कार्यकत्यांनी केलेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पत्रकारांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र तब्बल चार तास पोलिसांनी पत्रकारांना बसवून ठेवीत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या भूमिकेविषयी पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले.

भाजप कार्यकत्यांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाचे समाज माध्यमांवर तीव्र पडसाद उमटले. पत्रकारांनी निषेध केल्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांची माफी मागून संबधित कार्यकत्याची हकालपट्टी केली जाईल असे आश्वासन दिले तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकारांची माफी मागत हि अक्षम्य चूक असल्याची कबुली दिली. मात्र संबधित कार्यकत्यांवर कारवाईची मागणी पत्रकार संघटनांकडून जोर धरू लागली आहे. तसेच मराठा समाजाच्या कार्यकत्यांला मिडीयाशी संवाद साधू न दिल्याबद्दल मराठा समाजाच्या कार्यकत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *