मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना आज मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे रु. २५,०००/- चे आर्थिक सहाय्य संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले. वारीशे यांच्या पश्चात वयोवृद्ध माता व १९ वर्षीय चिरंजीव हे आहेत. त्यांच्या पत्नी सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन पावल्या. त्यानंतर वारीशे व त्यांच्या आईने त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा सांभाळ केला.
शशिकांत वारीशे यांच्या दुर्दैवी हत्येमुळे त्यांच्या आईला व मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांचा मुलगा आयआयटीमध्ये शिकत आहे. पण वडिलांप्रमाणे आपली देखील हत्या होईल, या भीतीने त्याला पछाडले आहे. अशावेळी या दुर्दैवी कुटुंबियांच्या मागे सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. म्हणूनच मुंबई मराठी पत्रकार संघाने रु. २५,०००/- ची मदत वारीशे कुटुंबियांना जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारने वारीशे कुटुंबियांना त्वरित रु. ५० लाखांची मदत द्यावी, अशी मागणी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघासह इतर पत्रकार संघटनांनी सरकारकडे केली. सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वारीशे कुटुंबियांना त्वरित मदत करावी, असे आवाहन वाबळे यांनी आज केले.