पत्रकार केतन बेटावदकर हल्ला प्रकरण : आरोपींना त्वरीत अटक करून, कठेार कारवाई करा
पत्रकारांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट :
कल्याण : वृत्तसंकलनासाठी गेलेले पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर जमावाकडून सशस्त्र हल्ला करण्यात आल्याने राज्यातील सर्व पत्रकार संघटनांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून, पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. मंगळवारी कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांनी कल्याणचे पोलीस उपायुकत संजय शिंदे यांची भेट घेत या हल्ल्यातील आरोपींना त्वरीत अटक करून, कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त शिंदे यांनी यावेळी दिले. रूग्णालय तोडफोड आणि पत्रकारांवरील हल्ला या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी ७० ते ८० जणांच्या जमावाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र यातील अजून कोणाचीही ओळख पटलेली नाही. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन पत्रकार बेटावदकर यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
वरप गावातील रोहित भोईर या २२ वर्षीय तरूणाचा हॉली क्रॉस रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या तरूणाच्या मृत्युप्रकरणी नातेवाईकांनी रूग्णालयाच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवीत शेकडोंच्या जमावाने हॉस्पीटलची तोडफोड केली. त्याचवेळी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात घुसूनही औषधांची नासधूस करीत डॉक्टर व कर्मचा-यांना बेदम मारहाण करीत धिंगाणा घातला. तब्बल तीन ते चार तास जमावाचा गोंधळ सुरू होता. त्यामुळे इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती पत्रकारांना समजताच त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. त्याचवेळी वृत्तांकन करीत असतानाच जमावाने पत्रकार केतन बेटावदकर यांना बेदम मारहाण केली . त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्यावर धारदार शस्त्राने पायावर वार केले. बेटावदकर हे गंभीररित्या जखमी झाले मात्र त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी केतन यांना जमावाच्या तावडीतून कसेबसे सोडवले. पत्रकार बेटावदकर यांच्यावर मीरा हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पत्रकारावरील हल्ल्याचा कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्हयातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केलाय. आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी पत्रकार संघटनेकडून करण्यात आलीय.
पोलिस आणि गोपनीय यंत्रणाही निष्प्रभ ?
रविवारी दुपारी २ वाजल्यापासून शेकडोंच्या हिंसक जमावाने रूग्णालयाची तोडफोड करून डॉक्टर व कर्मचा-यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. तब्बल चार तास हा गोंधळ सुरू होता. मात्र रूग्णालयात तुटपुंजे पोलीस बळ तैनात होते. जमावाने हिंसक रूप धारण केले असतानाही पोलिसांनी याकडे फारसं लक्ष का दिलं नाही. पोलिसांच्या गोपनीय यंत्रणेलाही याची माहिती उशिराने का मिळाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालय. सदर ठिकाणी पत्रकार पोहचले त्यावेळी तुटपुंजे पोलीस बळ तैनात होते. जमाव हिंसक झाला असतानाही पोलिसांनी कुमक बोलवली नाही. पोलीस यंत्रणाही जमावापुढं निष्प्रभ ठरली होती. काही दिवसांपूर्वीच नेवाळी येथे हिंसक जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. त्यावेळीही पोलिसांची गोपनीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाल होत.