मुंबई ; (शांताराम गुडेकर ) – कोकणातील अनमोल रत्न आणि गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे राजकीय पत्रकार काशिनाथ म्हादे यांना निर्भीड पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. राजकीय विश्लेषक, वरीष्ठ पत्रकार आणि दै. प्रहारचे संपादक डॉ.सुकृत खांडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या केंद्र सरकार नोंदणीकृत संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ, सरचिटणीस सामंत, उपाध्यक्ष के. रवी आणि मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यावेळी उपस्थित होते.
काशिनाथ महादेव म्हादे गेल्या १३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. क्राईम, शिक्षण, आरोग्य, मुंबई महापालिका बीट ते राजकीय वार्ताहर असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. दैनिक लोकमत, सकाळ, आपलं महानगर, तरूण भारत बेळगाव, नवशक्ती, पुढारी या अग्रगण्य वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. मागील 2 वर्षांपासून Etv भारत या वेब चॅनलसाठी मंत्रालय प्रतिनिधी आणि राजकीय वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.
रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यातील तळसर गावचे काशिनाथ म्हादे रहिवासी आहेत. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. आई – वडील शेतकरी होते. त्यामुळे आते भाऊ श्रीकांत पिटले यांनी त्यांना मुंबईत आणले. गीता वहिनींनी शिक्षण घेण्यास भाग पाडले. दत्ताराम वकटे भावोजींनी नोकरीला लावले. वाचनाची, लिखाणाची आवड असल्याने शिक्षण घेत असताना त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक सकाळ मध्ये सर्वांनीच मला घडविण्यास हातभार लावला. विशेषतः पीटीआयचे ज्ञानेश चव्हाण हे पत्रकार क्षेत्रातील त्यांचे गुरू. त्यांनी नेहमीच बातमी लिहिण्यापासून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. नवखा असल्याने अनेक चढउतार आले. त्यावर मात त्यांनी केली. वडील, आई, बहीण, भाऊ आणि मित्रमंडळीना त्यांच्या मेहनतीचा प्रचंड अभिमान होता. तो सार्थ ठरवताना, राजकीय पत्रकार म्हणून आज त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेत निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले. पत्रकार काशिनाथ म्हादे हे कोकण विभाग म्हादे परिवार विभाग संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान मुंबई या संघटनेचे सरचिटणीस देखील आहेत.
सुकृत खांडेकर सरांच्या सोबत २०१७ मध्ये दै. नवशक्ती या वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या हातून हा पुरस्कार मिळणे हे माझं भाग्य समजतो. मात्र, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही. अनेक हातानी मला इथपर्यंत पोहचवले आहे. माझी आई छाया, पत्नी आदीती, मोठी बहीण जयश्री लाड, माई, ज्योती, पिंकी, भावोजी जयंत लाड, निलेश शिगवण, प्रशांत रेवाळे, अनंत चव्हाण, भाऊ रवींद्र, संदेश, संदीप दादा, सुर्या दादा आणि त्यांच्या पत्नी पिंकी, अस्मिता, श्रुतिका वहिनी, माझा जिवलग मित्र तथा मार्गदर्शक कोकण वृत्तसेवाचे मुख्य संपादक प्रशांत गायकवाड, रुपेश सुर्वे, अमित राणे, प्रदीप भीतळे, सुनील गावडे, ईटीव्हीचे व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ यांची नेहमीच साथ राहिली. ईटीव्ही भारतचे मुंबई ब्युरो सुरेश ठमके यांनी सतत झोकून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे हा बहूमान मला मिळाला, असे मत काशिनाथ म्हादे यांनी व्यक्त केले. तसेच, पुरस्कार बाबांना समर्पित केल्याचे ते म्हणाले. आज ते हयात नाहीत, मात्र नेहमीच लढण्याचे बळ आणि जिंकण्याची जिद्द देतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.