मुंबई : आजची तरूण पिढी ही वैचारिकदृष्टया मागे चालली आहे. त्यांच्या मनात भलतंच पेरलं जातय. त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या लढयाचे महत्व अजूनही संपलेले नाही.पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणत असलेा तरी दीडशे वर्षानंतरही त्याच गोष्टी सांगण्याची गरज वाटते. प्रत्येक माणसाने सत्यशोधक होणे ही आजची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य, सुप्रसिध्द गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी केले. पुरोगामी महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे योगदान या परिसंवादात ते बोलत हेाते.
दैनिक शिवनेर व श्री सावता माळी भुवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण, आणि शिवनेरकर विश्वनाथ वाबळे यांच्या संयुक्त पुण्यतिथी कार्यक्रमाचे मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कामगार नेते महेंद्रशेठ घरत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राही भिडे, पुरोगामी विचारवंत दत्ता बाळ सराफ, यशवंत हप्पे, दै. शिवनेरचे संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, सावतामाळी ट्रस्टचे अध्यक्ष शरद अभंगे, सेक्रेटरी हेमंत मंडलीक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाल आणि तुळशीचे रोप देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पांढरपट्टे म्हणाले की, सत्यशोधक समाजाची चळवळ ही खेडयापाडयात पोहचलेली संपूर्ण भारतातील एकमेव पहिली चळवळ होती. महात्मा फुले हे समाजातील शेटजी आणि भटजी या दोन घटकांविरोधात होते. सत्यशोधक समाजाचा लढा या विरोधात होता. सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी हे त्यांचे घोषवाक्य आणि धोरण होते. महात्मा फुले यांना परलोक आणि पूर्नजन्म त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे लोकांना त्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
दिलीप पांढरपट्टे पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे पूर्णपणे नास्तिक होते. सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी हे त्यांचे घोषवाक्य आणि धोरण होते. महात्मा फुले हे समाजातील शेटजी आणि भटजी या दोन घटकांविरोधात होते. सत्यशोधक समाजाचा लढा या विरोधात होता. स्वातंत्रय समता बंधुता हा सत्यशोधक समाजाचा मूळ विचार आहे. फुलेंनी सत्य हा शब्द का वापरला या विषयी बोलताना ते म्हणाले की, फुलेंना सत्य ही फार महत्वाची गोष्ट वाटत हेाती. खरं बोललं पाहिजे, खरं आहे ते उघड झाले पाहिजे असे ते म्हणायचे. आपला समाज हा दांभीक, लबाड आहे. हा समाज सत्य सांगत नाही, सत्य पचवत सुध्दा नाही. त्यामुळेच फुलेंनी सत्य हा शब्द आवर्जून वापरला आहे असे विश्वकोशात तर्कतीर्थांनी म्हटल्याचे पांढरपट्टे यांनी सांगितलं. प्रत्येक माणसाने सत्यशोधक होणे आजची गरज आहे. प्रत्येकाला बुध्दी आहे . बुध्दी ज्याला आहे त्याने सत्याच्या शोधात कायम राहिले पाहिजे. आणि जेथे लबाडी खोटेपणा आहे त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे ही सत्यशोधक समाजाची खरी मांडणी आहे. आजही त्या मांडणीची गरज आहे असे पांढरपट्टे यांनी सांगितले.
आजही स्त्रीयांवरील अन्याय- अत्याचार सुरूच आहेत – राही भिडे
ज्येष्ठ पत्रकार राही भिडे या परिसंवाद बोलताना म्हणाल्या की, पुरोगामी चळवळीने हा महाराष्ट्र घडला आहे. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचा स्त्रीयांवर त्या काळात अन्याय, अत्याचार होत होते, त्याच्यात काहीच फरक पडलेला नाही, अजूनही हे अन्याय अत्याचार होतच आहेत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. स्त्री, शुद्रांना एकाच दावणीला बांधून अत्याचार केले त्याचे दाहक वास्तव फुलेंनी चळवळीत विचार मांडले. स्त्री पुरूष दोघांना समान अधिकार असले पाहिजे यासाठी चळवळ सुरू केली होती त्यात पत्नी सावित्रीबाईंना सहभागी करून घेतले आणि शिक्षणाची सुरूवात केली. वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा केली जाते. त्यामुळे आजही रूढी परंपरेचे जोखड महिलांच्या मानगुटीवरून कमी झालेले नाही. तंत्रज्ञानाच्या युगात मनुवाद उफाळून येतोय त्याचा विचार करणार नाही का ? धर्मांधांनी उपेक्षित मागास स्त्रीयांचे शोषण केले आहे, त्याविरोधात आवाज उठवायला आपण कमी पडलो का ? याचा विचार झाला पाहिजे. आत्मपरिक्षण केल्याशिवाय चळवळ पुढे जाणार नाही आपण सत्यशोधक चळवळीच्या गोष्टी करतो धर्मवाद्यांबरोबर तडजोडी करतो. पुरोहीतशाही परत येते का ? घडयाळाचे काटे उलटे फिरताहेत का ? याबद्दल चिंता व्यक्त करतो, हे दुटप्पी धोरण नाही का ? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत हे दुटप्पी, बोटचेपे धोरण चळवळीचे खच्चीकरण करते. आजची परिस्थिती तशी आहे. त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत भिडे यांनी मांडले.
नव्या पिढीपर्यंत विचार पोहचविण्याची गरज : दत्ता बाळ सराफ
पुरोगामी विचारवंत दत्ता बाळ सराफ या परिसंवाद म्हणाले की, फुले हे मुलत: उत्तम व्यावसायिक होते. त्यामुळे त्यांची एकही चळवळ अशी दिसत नाही त्याचे आर्थिक नियोजन नाही. डोंगरीच्या तुरूंगातून टिळक आगरकरांना दहा हजार चा जामीन फुलेंनी दिलाय. ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर चळवळीचा इतिहास सांगणा-यांनी या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. फुलेंनी विचारवंत्यांचा काम केले असं म्हणता येणार नाही. कृतीने आराखडा बजेट तयार असायचं. स्वत:चा व्यवसाय कसा उभा करायचा हे सत्यशोधक समाजाने सांगितले. सत्यशोधक समाजाने ज्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले सगळेच त्यापासून आपण खूप दूर गेलाेय. नेत्यांना मतदार संघाच्या पलिकडे काही दिसत नाही. महाराष्ट्राला नेता नाही. मतदार संघापुरता नेता उरला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सत्यशोधक समाजाची तत्व, दीडशे वर्षाची कार्यक्रम पत्रिका तशीच लागू पडते. ती नव्या पिढीपुढे नेण्यात आपण कमी पडत असू तर त्याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या मुलांना नव्या पिढीपर्यंत कस पोहचता येतील याचा गरज आहे. वैचारिक प्रबोधन ही सातत्याने करण्याची गोष्ट आहे. तुमच्या विचाराचे लोक घ्ज्ञडविण्यासाठी प्रयत्न केले नाही तर एक दिवस कुठल्या तरी विचाराचे लोक येऊन सगळा समाज घेऊन जातील हे आपण पाहतोय यातून पुढे जाण्यासाठी मुलांची कार्यशाळा घेण्याची गरज आहे असे मत दत्ता बाळसराफ यांनी मांडले.
फुले यशवंतरावांचा महाराष्ट्र नाही : मधुकर भावेंची खंत
महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रातील नररत्ने या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान पार पडले. महत्मा फुले पुण्यातिथी किंवा यशवंतरावांच्या कार्यक्रमाला ५० माणसे जमू नये. महाराष्ट्र पुरोगामी की प्रतिगामी आहे. पत्रकारितेतील वर्षे फुकट गेली अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गांधी फुले आणि बसवेश्वर यांना महात्मा पदव्या का मिळाल्या त्याला कारण आहेत. ही किती मोठी माणसं होती. १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र मिळाला. आताचा महाराष्ट्र बघवत नाही. हा यशवंतराव फुलेंचा महाराष्ट्र नाही. प्राणपणाने उभे राहण्याची गरज आहे असे भावे म्हणाले. क्रांतीसिंह नाना पाटलांसोबत विश्वनाथ वाबळे यांनी केलेले काम आणि यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा देताना भावे भावनिक झाले. यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नरेंद वाबळे यांनी केले तर हेमंत मंडलीक यांनी आभार मानले.
**