ठाणे, दि. २३ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागाची पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी घरे वा जमीन दिली आहे. या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यासाठी आठवड्याभरात विशेष कॅम्प घ्यावीत, असे आदेश केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी येथे दिले. त्याचबरोबर धरणात वाढीव क्षेत्र गेलेल्या जमिनीचे वाढीव क्षेत्र गेलेल्या शेतकऱ्यांनाही नोकरी किंवा पैसे देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशही पाटील यांनी दिले
ठाणे जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पार पडली. या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी, आमदार गीता जैन, आमदार गणपत गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्यासह जिल्ह्यातील महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा आढावा पाटील यांनी घेतला. तसेच सर्व योजनांची कामे वेगाने करण्याबरोबरच शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्याचे आवाहन केले.
बारवी धरणातील १२०४ प्रकल्पग्रस्तांना एमआयडीसी व पाणी मिळणाऱ्या महापालिकांकडून नोकरी दिली जाणार आहे. संबंधित जमिनीचे पैसे न घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळालीच पाहिजे. या दृष्टीकोनातून महापालिकांनी यादी तयार करावी. बारवी प्रकल्पग्रस्त थेट महापालिका व एमआयडीसी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांना नोकरी देण्यासाठी मुरबाडच्या ग्रामीण भागात विशेष कॅम्प आयोजित करावे,असे आदेश राज्यमंत्री कपिल पाटील यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. प्रकल्पग्रस्तांसाठी जागा शिल्लक नाहीत, अशी सबब कोणत्याही महापालिका प्रशासनाने देऊ नये. तर त्यांच्यासाठी नवीन पदे निर्माण करावी. त्याबाबतचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, असे निर्देश कपिल पाटील यांनी केले.
भारत नेटमधील अडथळे दूर करा
प्रत्येक ग्रामपंचायतीत भारत नेट जोडणी देण्यासाठी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, वन आदींसह सर्व विभागांची एकत्रित बैठक घ्यावी. त्यात सर्व अडथळे दूर करावेत, असे निर्देशही पाटील यांनी दिले.
लस संदर्भात माहिती देण्याचे आदेश
जिल्ह्यात पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना किती लसीकरण झाले, याबाबतची राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विचारली. मात्र त्याबाबत कोणतीही माहिती अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नव्हती. त्यावेळी संबंधित माहिती आपल्याकडे पाठविण्याचे आदेश कपिल पाटील यांनी दिले.
फलक लावण्यास टाळाटाळ
केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पानुसार ठाण्यात उद्यानांसह विविध कामे केली जात आहेत. मात्र, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निधीतून काम केल्याचे फलक दर्शनी भागात लावल्याचे टाळले जात आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. आयजीच्या जीवावर बायजी उदार असल्याची टीका आमदार डावखरे यांनी केली .