ठाणे : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आव्हाडांना अडकवण्याचा षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसलेले आहेत तिथून १० फुटाच्या अंतरावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंनी तसं घडलं नसल्याचं सांगायला हवं होतं, असं अजित पवार म्हणाले. मात्र पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलेच्या तक्रारीनुसार पोलीस पुढील चौकशी करत आहेत. पोलिसांना त्यांचं काम करु द्यावं. ते नियमानुसार कारवाई करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही.”

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासात दोन गुन्हे दाखल करणं चुकीचं असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर आव्हाड हे पुढं जात असताना जे समोर आले त्यांना बाजूला करत होते, त्यात कसला विनयभंग झाला ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. सरकार येत असतं सरकार जात असतं. माझ स्वत:चं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्र्यांनी तसं घडलं नसल्याचं सांगितलं पाहिजे होतं. फक्त मुख्यमंत्री नाही तर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यानं देखील तसा प्रकार घडला नसल्याचं सांगायला हवं होतं असं अजित पवार म्हणाले. आमच्याकडे १९९९ ते २०१४ पर्यंत आणि मविआच्या काळात अडीच वर्ष साडे सतरा वर्ष गृहमंत्रालय होतं. पण, आमच्या काळात अशा प्रकारचा अन्याय केला जात नव्हता. विनयभंगाचा गुन्हा दिसत नसताना लोकप्रतिनिधीला गोवणं चुकीचं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण
रविवारी कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्यावेळी तेथे खूपच गर्दी झाली होती. त्या गर्दीतून आव्हाड हे वाट काढीत असतानाच पीडित महिलेला आव्हाड यांनी हाताने बाजूला सारीत वाट काढली. त्यामुळे पीडित महिलेने दावा केला आहे की आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पध्दतीने शरीराला स्पर्श करत बाजूला होण्यास सांगितले. त्यामुळे त्या महिलेने पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!