jitendra-awhad

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च अशा शक्तीमान माणसाच्या नेतृत्वाखाली असे कटकारस्थान रचले जात आहेत.  खोटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत आहेत.

खोटे गुन्हे टाकले जातात. जे भाई लोक  मोठ्या भाई लोकांशी दुबईमध्ये इथे-तिथे बोलतात. त्यांच्या केसेस दाबल्या जातात. उलट आम्हालाच प्रश्न विचारला जातो, असा खळबळजनक आरोपही डॉ. आव्हाड यांनी यावेळी केला. त्यामुळे सर्वोच्च शक्तीमान माणूस कोण ? अशीच चर्चा ठाण्यात रंगली आहे.

समाजमाध्यमांवर डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांवर अश्लील पोस्ट करणार्‍या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. या प्रकरणी ठाणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, सदर व्यक्तीने सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली. तसेच, ज्या न्यायालयात ह्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्याच न्यायालयात तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या खटल्याच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी नमूद केलेल्या अनेक खोट्या बाबी डॉ. आव्हाड यांनी उघडकीस आणल्या. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे उपस्थित होते.

डॉ. आव्हाड म्हणाले की, 5 एप्रिल 2020 रोजी फेसबुकवर आपणांविरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत आमच्या काही कार्यकर्त्यांची हमरीतुमरी झाली होती. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले होते. पावणेदोन वर्षानंतर त्याची याचिका फेटाळताना, “हा माणूस खोटारडा असून स्वच्छ हाताने आणि स्वच्छ हेतूनं न्यायालयात आलेला नाही”, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदविले होते. त्यानंतर सदर व्यक्तीने सर्वोच्च न्यायालय गाठले होते. सर्वोच्च न्यायालयात वाद-प्रतिवाद झाला.

या व्यक्तीच्या मागे महाराष्ट्रातील सर्वशक्तीमान व्यक्ती उभी होती. या सर्व शक्तीमानसोबत राज्य सरकारही उभे होते, याबाबत कोणतीही शंका नाही. किंबहुना, सर्व शक्तीमान माणसाने आर्थिक शक्ती निर्माण केली होती. त्या आर्थिक शक्तीच्या जोरावर आणि सर्व शक्तीमान माणसाच्या आधारावर ती व्यक्ती आपली तलवार सर्वोच्च न्यायालयात चालवित होती. सर्वोच्च न्यायालयात त्याला मदत व्हावी म्हणून राज्य सरकार म्हणजेच ठाणे पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. ते म्हणजे आधी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते; त्याच्या बरोबर उलट प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. सरकार बदलल्यानंतर प्रतिज्ञापत्र बदलतं, असे कधी होत नाही. पण, असे यावेळी घडले. त्यांनी वर्तक नगर पोलिसांवर ठपका ठेवला.

या प्रतिज्ञापत्रात सर्वात धक्का।दायक प्रकार असा होता की, आपणाला चक्क गँगस्टर असल्याचे न्यायालयासमोर भासविण्यात आले. आपली गुन्हेगारी कारकिर्द असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले. वास्तविक पाहता, करमुसे प्रकरण वगळता आपणांवर एकही शारीरिक इजेचा गुन्हा नाही. आपणांवर जे गुन्हे दाखल आहेत; ते सर्व आंदोलनातील गुन्हे आहेत. पोलिसांनी जे २४ गुन्हे दाखविले आहेत. ते सर्वच राजकीय-सामाजिक आंदोलनातील असून पैकी २० गुन्हे निकाली निघाले आहेत. आंदोलनातील गुन्हे असणारी माणसेच राजकारणात असतातच; असे गुन्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहेत. मग, त्यांनाही अट्टल गुन्हेगार म्हणणार का?, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

आपण कोणाच्या दबाखाली येऊन काय करतोय, याचे भान पोलिसांनी ठेवायला हवे. आपल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी अत्यंत हास्यास्पद बाब नमूद केली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या लोकशाहीला घातक आहे. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “जितेंद्र आव्हाड हे विविध मोठ्या माणसांविरुद्ध सोशल मिडीया, ट्वीटरद्वारे टीका करतात. भारताचे प्रधानमंत्री व भारताचे गृहमंत्री यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. ते अशी कमेंट करीत असतात की, ज्यामुळे दोन समाजात वाद निर्माण होईल. ” जर, मी अशी टीका केली आहे. तर, माझ्यावर तशी केस का घेतली नाही? अजूनही आपले आव्हान आहे की अशी केस करावी. जर, आपण दोन समाजात वाद निर्माण केला असेल तर आपणांवर गुन्हा दाखल करुन अटक का केली नाही? आपल्या 35 वर्षांच्या कार्यकाळात जेव्हा जेव्हा या शहरात सामाजिक तेढ निर्माण झाली. तेव्हा तेव्हा आपणच ही तेढ सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तत्कालीन पोलिसांना हे चांगले माहित आहे.

पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव जेव्हा प्रतिज्ञापत्र सादर करतात; तेव्हा आपण खोटे लिहित आहोत, याची कल्पना नाही त्यांना? हा एवढा गंभीरपणे खोटे मुद्दे मांडणारे प्रतिज्ञापत्र सादरच कसे केले जाते? अमरसिंह जाधव यांचे हे प्रतिज्ञापत्र पोलीस आयुक्तांना विचारल्याशिवाय सादर झालेले नसणार!म्हणजे, आमची इभ्रत आहे की नाही? म्हणजे, आता आदेश आळा म्हणून पोलीस खोटे प्रतिज्ञापत्रही सादर करतील. ही अतिशय दुर्देवी बाब आहे की, पोलीस खोटे प्रतिज्ञापत्र सादर करु लागले अहेत. सोशल मिडीयावर संसदीय शब्दांचा वापर करुन टीका करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आजपर्यंत ठाणे पोलिसांनी आपणावर गुन्हा का दाखल केला नाही. तुम्ही किती खोटारडे आहात, हे पोलिसांनी स्वत:च सर्वोच्च न्यायालयातच दाखवून दिले आहे, असेही डॉ. आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!