डोंबिवली : एका सराफानेच सर्वसामान्यांनी कष्टाने बनविलेले लाखो रूपयांचे सान्याचे दागिने लुटून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. मात्र या घटनेची एफआयआर नोंद करण्यासाठी विष्णुनगर पोलिसांनी तब्बल तीन महिने लावले. कमल ज्वेलर्सचा मालक बजरंग दास असे त्या लुटारू सराफाचे नाव आहे. आठ महिने होऊनही बजरंगदासला अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे अखेर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे एका निवेदनादवारे साकडे घातले आहे.
डोंबिवली पश्चिमेत कमल ज्वेलर्स नामक दुकान सुरू करण्यात आले होते. या दुकानात अनेक नागरिकांनी नवीन सोन्याचे दागिने बनविण्यास दिले होते तर अनेकांनी दागिने तारणही ठेवले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात कमल ज्वेलर्सचा मालक बजरंगदास याने अनेकांचे लाखो रूपयांचे दागिने आणि पैसे घेऊन दुकान बंद करून फरार झाला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये रोहिणी जयेश मढवी, उमेश भोईर, सचिन भोईर, संतोष बेंद्रे, वैदेही जाधव, प्रशांत बनसोडे, अनुष्का मोरे, वंदना जाधव, रवी ढोणे, शिवा अय्यर यांच्यासह अनेक नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये प्रत्येकांची लाखो रूपयांची फसवणूक झालेली आहे.
कष्टाचा पैसा, दागिने कधी मिळणार ? सर्वसामान्य चिंतेत
ज्वेलर्स मालक बजरंग दास फरार झाल्यानंतर फसवणूक झालेल्या नागरिकांनी विष्णनुगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र प्रथमतः पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यात चालढकल केली. अखेर फसवणूक झालेल्या नागिरकांनी डोंबिवली पश्चिम काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शरद भोईर यांच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. केणे यांनी कल्याण पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर, अखेर तीन महिन्यानंतर विष्णुनगर पेालीस ठाण्यात बजरंगदास विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा कष्टाने कमावलेला पैसा एक माणूस लुटून नेतो आणि पोलीस साधी केस घेत नाहीत. नागरिकांना साधा गुन्हा दाखल करण्यासाठी तीन महिने लागतात याविषयी नागरिकांच्या मनात पोलिसांच्या कार्यतत्परतेविषयी नाराजी व्यक्त होत आहे. कष्टाने कमावलेला पैसा दागिने कधी मिळणार याच चिंतेत नागरिक आहेत.
पोलीस गावी गेले, नोटीस दिली आणि हात हलवत परतले …
फसवणूक झालेल्या गृहिणी अनुष्का मोरे यांनी सांगितले की, माझे तीन तोळयाची चैन आणि इतर छोटे ४ तोळयाचे असे एकूण सात तोळयाचे दागिने आहेत. तर रोहिणी मढवी यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये नवीन मंगळसूत्र बनवले होते. त्याचे पूर्ण पैसेही जमा केले होते. दोन दिवसात देतो असे त्यांनी सांगितले होते. पण दोन दिवसानंतर दुकान बंद करून तो फरार झाला. मार्चमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला पण पोलिसांनी तक्रार नेांदवली नाही अखेर एप्रिलमध्ये संतोष केणेसाहेबांकडे आल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांकडे गेल्यानंतर २७ जूलैला एफआरआय नोंद झाली. पण अजूनही कोणताही तपास लागलेला नाही. शिवा सुब्रमण्यम यांनी सांगितले कि, वडीलांनी चैन रिपेअरींग करण्यासाठी कमल ज्वेलर्सकडे दिली होती. पोलिसांना बजरंगदास याचा मोबाईल नंबर दिला आहे. पोलीस राजस्थान पाली येथे त्याच्या गावी गेले. त्याच्या घरी नोटीस दिली असे पोलिसांनी सांगितले. पण अजूनही त्याला अटक केली जात नाही या विषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन ..
येत्या फेब्रवारी महिन्यात या घटनेला एक वर्ष होईल. मात्र पोलिसांकडून अजूनही तपास कागदावरच आहे. फरार बजरंग दास ला त्वरीत अटक करण्यात यावी या मागणीसाठी फसवणूक झालेल्या नागरिकांनी प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष केणे यांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे. बजरंगदास हा डोंबिवलीतील अनेक ज्वेलर्सच्या संपर्कात असल्याचेही फसवणूक झालेल्या नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे फरार बजरंगदासला अटक करण्यात विष्णुनगर पोलीसांना यश कधी येईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
*****