नवी दिल्ली : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी दिली. जया बच्चन या चार वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी जया बच्चन तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत जातील, अशी उलटसुलट राजकीय चर्चा होती. त्यांना समाजवादी पक्षानेच सलग पाचव्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आभार देखील मानले. त्यासोबत माजी खासदार रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन यांनाही सपाने उमेदवारी दिली. रामजीलाल सुमन हे उत्तर प्रदेशातील दलित नेते म्हणून प्रसिद्ध असून त्यांचा आग्रा व अलिगड या भागांमध्ये चांगलाच प्रभाव आहे. त्यांना उमेदवारी देऊन दलित मतांवर नजर ठेवली आहे. त्याचप्रमाणे माजी सनदी अधिकारी राहिलेले आलोक रंजन यांना पहिल्यांदाच समाजवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आलोक रंजन अखिलेश यादव यांचे मुख्य सल्लागार होते आणि त्यांना उत्तर प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाचे एमडी म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती.