मुंबई : “लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय” असं आक्षेपार्ह विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुण्यातील खऱाडी इथल्या सभेत केलं होतं. पण आता हे विधान अंगलट आल्यानं लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे.
जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, माझा म्हणायचा उद्देश तसा नव्हता, वेगळा होता. पण विनाकारण त्याला जातीकडं ओढण्याचा प्रयत्न करायला लागले. काहींनी त्या शब्दाचा विनाकारण गैरसमज केला तर काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडं ओढलं.
माझं म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, कारण मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केलेला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतू आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही. तरीही काहीजणांचा जर गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.