पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता संतुलित विकास व्हावा :    पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे  : पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता संतुलित असा विकास झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. कांदळवने टिकावीत म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारे आपण  प्रयत्न करीत आहोत. पर्यावरणाला धोका पोहचविणाऱ्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.  सीआरझेड संदर्भात आपल्या सर्वांच्या भावना आम्ही लोकप्रतिनिधी  वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे पोहचवूत असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

जिल्ह्याच्या सीआरझेड प्रारुपावर सुनावणीस नागरिकांची उपस्थिती

ठाणे जिल्हयाच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात प्राप्त हरकतींवर जन सुनावणी आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती ,त्यावेळी ते बोलत होते. खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, महापौर मीनाक्षी शिंदे तसेच जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण पर्यावरण विभाग यांचेमार्फत सीआरझेड अधिसुचना 2011 अंतर्गत एकत्रित ठाणे व पालघर जिल्हयाचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे (CZMPS) बनविण्याचे काम सेस (NCESS) केरळ यांचेमार्फत पुर्ण झाले असून सदर आराखडे प्रसिध्द करणे त्यावर 45 दिवसात हरकतींवर जन सुनावणी घेण्याचे निर्देश होते. लोकप्रतिनिधी म्हणून मी या जनसुनावणीस हजर आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की,१९६५-७० मध्ये बांधकामे झाली आहेत, याठिकाणी कोळीवाडे देखील आहेत.  ती मुंबईच्या धर्तीवर संरक्षित करण्याबाबतीत तसेच सीआरझेड नकाशे तसेच इतर अनुषंगिक बाबींबाबत लोकांच्या सूचनांचा निश्चितपणे वरिष्ठ पातळीवर विचार व्हावा अशी आपली अपेक्षा आहे. खासदार राजन विचारे यांनी देखील बोलतांना सांगितले की, संसदेत लक्षवेधीच्या माध्यमातून मी कायम याविषयी बोलत असतो. हरकतींसाठी अधिक वेळ मिळावा अशी सूचनाही त्यांनी केली. प्रारंभी निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी विविध संघटना, निम शासकीय, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांनी १८० पेक्षा जास्त हरकती सादर केल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या सुचना व हरकती मांडल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *