ऑनलाईन दत्तक मूल पद्धतीत बदल करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
‘जननी आशिष ‘संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिन साजरा
डोंबिवली :- तीन- चार वर्षांपूर्वी मूल दत्तक देताना पालकांची चौकशी होत. गेल्या चार वर्षांपासून ऑन लाईन पद्धतीने मूल दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे योग्य प्रकारे पालकांची माहिती होत नाही. मुले व पालक यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याने काही मुले पुन्हा संस्थेत येऊ लागली आहेत. त्यामुळं या पद्धतीत बदल करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. जननी आशिष ‘संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिना च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्योजक लक्ष्मीकात राठी अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान , बिना धुत, जयश्री मोकाशी आदी उपस्थित होत्या.
खा.डॉ.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी २१ महिलांनी ही संस्था सुरू करण्याचे धाडस केले. आपण समाजाचं देणं लागतो असे नुसते बोलतो पण काहीच करत नाही. या महिलांनी बोलून दाखवलं नाही तर अनाथ मुलांचं संगोपन करण्याचे काम केले. आतापर्यंत ४६० मुलांना पालक मिळवून दिले, हे फार मोठे व वेगळे काम आहे. गेली २५ वर्ष ही संस्था हे काम करत आहे. पण चार वर्षांपासून नवा कायदा आला व मूल ऑन लाईन पद्धतीमुळे देशाच्या कोणत्याही भागात दत्तक जाऊ लागली. नव्या तंत्रज्ञानाचे जसे लाभ आहेत तसे तोटे पण आहेत. पालक व मुले याची नीट ओळख होत नाही. माहिती मिळत नाही. अशा घरात ते मूल जाते व काही दिवसांनी त्याच्यात दुरावा निर्माण होऊन काही मुले पुन्हा संस्थेत येऊ लागली आहेत. दत्तक मूल पुन्हा येऊ लागल्याने उद्देश साध्य होत नाही. म्हणून यामध्ये बदल करावा व जूनी पद्धत आणावी यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणार असून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे ५ लाख रुपयांची देणगी संस्थेला दिल्याची घोषणा केली. जनतेनेही सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले. तसेच खा. डॉ. शिंदे यांचे हस्ते संस्थेच्या समरनिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान, जयश्री देशपांडे यांचीही भाषणे झाली.
आपलाही खारीचा वाटा द्या !
गेल्या २५ वर्षांपासून अनाथ मुलांच्या संगोपणाचे काम जननी आशिष संस्थेच्या माध्यमातूनडॉ. कीर्तीदा प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलांची टीम हे काम करीत आहे. त्यांच्या कामाला तोड नाहीय. या संस्थेला शासनाचे अनुदान मिळत नाही. देणगीदारांच्या मदतीवरच संस्थेचे काम सुरू आहे. आजपर्यंत डोंबिवलीकरांनी विविध मार्गांनी मदत केलीय. आपलाही खारीचा वाटा मिळावा, असे आवाहन डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांनी केलंय.
दत्तक मुल घेण्यासाठी आँनलाइन प्रक्रिया धोक्याची आहे़़मूल दत्तक देणे म्हणजे वस्तु विकण्याइतके सोपे वाटले का आपल्या सरकारला . शेवटी हा एखाद्या जीवनाचा प्रश्न आहे. तरी सरकारनी ह्याचा गंभीरपणे विचार करावा. ही नम्र विनंती.