Jalna-tehsildar-car-smashed

संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद

२९ ऑक्टोबर मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मराठवाड्यात तापताना पाहायला मिळत आहे. जालना येथे महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यातील बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

या चार जिल्ह्यात एकूण ३० आगर असून, अंदाजे २८०० पेक्षा अधिक फेर्‍या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका बसतांना पाहायला मिळत आहे.

नांदेड, हिंगोली,प रभणी आणि लातूर जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी महावरकर आणि हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सुचनेनुसार एसटी विभागाने बस फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण ७ आगारातील ३८० बसेचच्या २८०० फेर्‍या आज रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ३५० बसेस जागेवर उभ्या आहेत. तसेच, आज सायंकाळी पाच वाजेनंतर उद्या बस सुरु करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

जालना येथील आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तहसीलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. जालन्यातील रामनगर येथील ही घटना असल्याचे समोर येत आहे. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढलेलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत ही गाडी फोडण्यात आली आहे.

तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात येण्याची गावकर्‍यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून रस्ता रोको देखील करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आंदोलनस्थळा जवलून जाणार्‍या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत असून, बीड आणि नांदेडमध्ये आज बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.

बीडहून कल्याणकडे जाणारी एसटी बस चराटा फाट्याजवळ आली असता, यावेळी आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरवून या बसवर तुफान दगडफेक केली.

यामध्ये बसच्या संपूर्ण काचा फुटल्या आहेत. तर दुसर्‍या घटनेत नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केलीय. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झालंय.

या प्रकरणी पोलीस दगडफेक करणार्‍या लोकांचा शोध घेतायत. मराठवाड्यातील या घटना पाहता एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बसेस रद्द करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *