आरपीएफ जवानाचा अंधाधुदं गोळीबार : चार ठार, मृतांमध्ये पोलिसाचा समावेश

पालघर : आज पहाटे ५ वाजून २३ मिनिटांनी खळबळजनक घटना घडली. जयपूर मुंबई पॅसेंजरमध्ये एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात एका आरपीएफ जवानासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारामुळे प्रवाशी हादरून गेले आहेत. दहिसर आणि मीरा रोड दरम्यान पालघर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

प्राथामिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल चेतन सिंग आणि त्याचा सहकारी जवान यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की चेतन याने आपल्या बंदुकीतून सहकारी जवानावर अंदाधूंद गोळीबार केला. बोगी नंबर बी-5 मध्ये ही घटना घडली. या अंदाधूंद गोळीबारात त्याचा सहकारी व तीन प्रवासी ठार झाले. चेतन हा एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. तो दहिसरच्या दिशेने पळून जात होता. मात्र, मीरा रोड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेतनला पोलिसांनी अटक केली असून त्याने हा गोळीबार का केला त्या दोघांमध्ये कशामुळे वाद झाला याची चौकशी सुरू आहे. चेतन हा मानसिकदृष्टया अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे. फॉरेन्सीक टीमही मुंबई सेंट्रलमध्ये पोहचली असून जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये पाहणी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!