मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. त्यात पूत्र पार्थ पवार आणि तीन बहिणींचा समावेश आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्या प्रकाराची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचाच संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा आणि आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी अशा शब्दात पवारांनी आयकर विभागाच्या कारवाईवरून भाजपवर निशाना साधलाय.
बारामतीतील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीसह पवारांच्या गाव असलेल्या काटेवाडी येथेही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीवरती आयकर विभागाकडून तर काटेवाडी येथे ईडीच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर गुरुवारी सकाळपासूनच ही छापेमारी करण्यात आलीय त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीका केलीय.
तीन बहिणींवर आयकरचा छापा का ? अजित पवार संतापले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील आणि कोल्हापूरमधील दोन बहिणींच्या मालमत्तांवरही आयकर विभागने धाडी टाकल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ अजित पवारांच्या नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असं अजित पवार म्हणाले.
ED, CBI , इन्कम टॅक्स हे आता भाजप चे कार्यालय
सांगली : ED, CBI , इन्कम टॅक्स हे आता भाजप चे कार्यलय BJP Office झाले आहे. या एजन्सी फक्त आघाडी च्या नेत्यावर कारवाई करतात. भाजपच्या एका नेत्यावर कारवाई केली जात नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी आज भाजप आणि तपास यंत्रणावरती केलीय.
किरीट सोमय्यांची जहरी टीका
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलय. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक, चालक आणि लाभार्थी कोण हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी अजित पवारांना दिलंय. अजित पवार हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी राजकारण करत आहेत. पण त्यांनी अर्थकारणावर बोलावं. किती कारखाने घेतले? किती भागधारक आहेत? असा सवालही सोमय्या यांनी यावेळी केलाय. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीनं विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.