राजकिय अनास्थेमुळे रखडले महाडमधील सिंचन प्रकल्प
महाड ( निलेश पवार) : महाड तालुक्याचा विकास जवळपास ठप्प झाला असुन, तालुक्याची पाण्याची तहान भागविणारे व सिंचनाचे महत्वाचे छोटे मोठे प्रकल्प पुर्णपणे रखडले आहेत. मंजुर होऊन कामाला सुरवात झालेले प्रकल्प राजकीय अनास्थेचे बळी ठरले आहेत. तालुक्यातील किंजळोली पाझर तलाव राजकीय कट कारस्थानामुळे गेल्या दहा वर्षा पासुन रखडला आहे. तर अशाच प्रकारे काळ जलविद्युत आणि आंबिवली धरण देखील प्रलंबित आहे.
महाड तालुक्याची काळ जलविद्युत प्रकल्प शासनाने बासनात गुंडाळून ठेवल्यानंतर महाडच्या राजकिय पटलावर या विषयी एकही प्रतिक्रीया उमटली नाही, कि प्रकल्पाच्या मागणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी आग्रह धरला नाही. याच धर्तीवर तालुक्यातील विन्हेरे, कोथेरी, नागेश्वरी, मांडले धरणांची कामे रखडली असुन कोथुर्डे आणि कुर्ले धरणांच्या क्षमता वाढविण्या कामांचे प्रस्ताव देखील लाल फितीत धुळखात पडले आहेत. मोठ्या धरणांसाठी संपादीत क्षेत्राची अडचण, कालवे करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि महाडच्या भौगोलीक रचनेमुळे प्रत्येक पंचक्रोशीत पाझर तलाव होणे फायद्याचे आहे. या पाझर तलावांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून, बहुतांश शेती सिंचना खाली येवु शकते. मात्र अनेक धरणांची कामे हि राजकीय अनास्थेची बळी ठरलेत.
किंजळोली पाझर तलावाच्या कामाला ब्रेक
महाड तालुक्यातील किंजळोली, पारवाडी, घुरुपकोंड या पंचक्रोशीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी मिटविणारा किंजळोली पाझर तलावाची कल्पना व मुहुर्तमेढ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडली. त्यानंतर तब्बल तीन दशकानंतर म्हणजेच २० ऑगस्ट २००८ रोजी या पाझर तलावाला मंजुरी मिळाली. या पाझर तलावाच्या निर्मितीने किंजळोली, पारवाडी, घुरुपकोंड परिसरातील ११६ हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येणार आहे. या विभागातील मांडले, पारवाडी, किंजळोली खु., किंजळोली बु., घुरुपकोंड, भालेकरकोंड, पिंपळकोंड या गावांचा पाण्याचा प्रश्न या पाझर तलावाने मिटणार आहे. या कामांच्या निविदा काढण्यात आल्या मात्र राजकीय कटकारस्थान आणि श्रेयवादाचा फटका बसल्याने हे काम रखडले आहे. बाधीत शेतकर्यांनी आगोदर मोबदला मगच तलाव अशी अडवणुकीची भुमीका घेतलीय. शेतकर्यांना मोबदला पोटी वाटपासाठी पुरेसा निधी आता सरकारकडे उपलब्ध नसल्याने अखेर या पाझर तलावाच्या कामाला ब्रेक लागलाय. महाड मधील काळ जलविद्युत प्रकल्प आणि आंबिवली धरण अशी अनेक कामे प्रलंबित आहेत.
प्रतिक्रिया :
स्थानिक शेतकर्यांच्या विरोधामुळे पाझर तलावाचे काम थांबविण्यात आले. शेतक-यांना संपुर्ण मोबदला देणे आवश्यक आहे. नविन भुसंपादन कायद्या अंतर्गत भुसंपाद करावे असे पत्र रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आले असून त्यांच्याकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हे काम स्थगित आहे. ए. बी. फुंडे, कार्यकारी अभियंता, लघु सिंचन ( जलसंधारण ) विभाग ठाणे
किंजळोली पाझर तलावाचे काम शेतकर्यांना मोबदला न देताच सुरु करण्यात आले होते. शेतकरी आणि ग्रामस्थांचा पाझर तलावाला विरोध नाही. मात्र प्रथम मोबदला मिळावा हीच त्यांची मागणी रास्त आहे. तसेच सदर ठेकेदाराने या ठिकाणी शेतकर्यांच्या शेतात भले मोठे चर खोदल्यामुळे शेतक-यांना शेती करता येत नाही याला जबाबदार कोण ? या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी. – नथुशेठ धामने, शेतकरी घुरुपकोंड