डोंबिवली : महावितरणचा बेजबाबदार कारभारामुळे ५ निष्पाप म्हशींना जीव गमवावा लागल्याची हृदय दावक घटना घडली आहे. महावितरणच्या विजेच्या खांबा जवळील उघड्या केबल वायर चा शॉक लागल्याने निष्पाप ५ म्हशीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात रविवारी सकाळी हि घटना घडली. या घटनेने महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरण अधिकाऱ्यांवर प्राणी हत्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात राहणारे गणेश पाटील यांच्या मालकीच्या या म्हशी आहेत. दूध विक्रीचा त्यांचा व्यवसाय असून या म्हशींवर त्यांचा उदरनिर्वाह होता. रविवारी सकाळी म्हशींना चरण्यासाठी घरातील गुराखी निघाला होता. वाटेत विजेच्या खांबाजवळ केबलची उघडी वायर पडली होती.या वायरीला म्हशी चिकटल्या आणि शॉक लागून त्या जागीच मरण पावल्या. त्यांना चरण्यासाठी नेणारा गुराखी हा थोडक्यात वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे काही कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात देखील नोंद करण्यात आली आहे. महावितरणने उघड्या केबल वायर चा त्वरीत बंदोबस्त केला पाहीजे. तसेच गणेश पाटील यांना भरपाई देखील मिळाली पाहीजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.