डोंबिवली : कोकण स्मार्ट शेअर बोक्रर कंपनीच्या एका संचालकाने डोंबिवली, मुंबई परिसरातील सात जणांना शेअर मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वार्षिक ७० टक्के परतावा देण्याचे आमीष गुंतवणूकदारांना दाखवून गुंतवणूकदारांची २७ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षाच्या काळात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.


या फसवणूक प्रकरणी मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या सुनीता योगेश नायक (५१) या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर इतर ६ गुंतवणूकदार पुढे आले आहेत. तक्रारदारांनी कोकण स्मार्ट शेअर ब्रोकर कंपनीचे संचालक प्रशांत जगदीश आंगणे यांच्या विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


डोंबिवली पूर्वेकडील मौलाना आझाद रोडला असलेल्या ओंकार इमारतीतील ॲक्सीस बँकेच्यावर कोकण स्मार्ट शेअर ब्रोकर एजन्सीचे कार्यालय आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण स्मार्ट शेअर ब्रोकर कंपनीचे संचालक प्रशांत आंगणे यांनी गुंतवणूकदारांना तुम्ही माझ्या शेअर ब्रोकर एजन्सीत गुंतवणूक करा. तुम्हाला तुमच्या गुंतवणूक रकमेवर वार्षिक ७० टक्के परतावा दिला जाईल, असे आमीष दाखविले. या आश्वासनावर विश्वास ठेऊन गुंतवणूकदार सुनीता नायक, साक्षी नायक, सुजिथा नायर, मधू नायर, माया मेन्डोसा, सचीन वर्गीस, प्रीथा हरिदास यांनी पाच ते ११ लाख रुपयांपर्यंतच्या रकमा आंगणे यांच्या एजन्सीत गुंतवणूक केल्या.

ऑगस्ट २०२० ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत आंगणे यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाने या रकमा उचलल्या. ठरल्याप्रमाणे दरवर्षी गुंतवणूकदारांना वार्षिक ७० टक्के परतावा आंगणे यांनी देणे आवश्यक होते. गुंतवणूकदारांनी वर्षानंतर आंगणे यांच्याकडे वार्षिक परतवा देण्यासाठी तगादा लागला. ते विविध कारणे देऊन टाळाटाळ करू लागले. वर्ष उलटले तरी परतावा मिळत नाहीत म्हणून गुंतवणूकदारांनी मूळ ठेवी परत देण्याची मागणी सुरू केली. त्यालाही ते प्रतिसाद देत नव्हते.


वर्ष उलटूनही आंगणे गुंतवणूकदारांना परतावा नव्हे तर मूळ रक्कम परत करत नसल्याने अखेर गुंतवणूकदारांनी त्यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी ठेवीदार गुंतवणूक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!