पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगणार मुलाखत

कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना नुकताच संसदेचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने ” अविश्रांत श्रीकांत ” या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार तसेच निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधतील. डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही प्रकट मुलाखत होईल. राज्यातील सत्तापालट, आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामे यांसह विविध राजकीय आणि अराजकीय गोष्टींचा उलगडा या मुलाखतीमधून होणार आहे.

वाचन संस्कृती टिकावी यासाठी गेल्या तीन दशकांहुन अधिक काळ पै फ्रेंड्स लायब्ररी काम करत आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून डोंबिवली शहरात विविध ठिकाणी पुस्तक प्रदर्शन, पुस्तक आदान प्रदान महोत्सव यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याच बरोबर विविध मान्यवर मंडळींच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात येत असते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना मानाचा संसद रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर आणि मुंबई महानगर क्षेत्रातील लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांपैकी हा पुरस्कार मिळालेले खासदार डॉ श्रीकांत शिंदे एकमेव खासदार ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर ” अविश्रांत श्रीकांत ” प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायब्ररीच्या वतीने देण्यात आली आहे. राजकीय मुलाखती आणि संवाद साधण्यात प्रसिद्ध असलेले सुप्रसिध्द गायक, दिग्दर्शक, संगीतकार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अवधूत गुप्ते यावेळी मुलाखतकाराची भूमिका पार पडणार आहेत. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही मुलाखत सुरू होईल. गेल्या दोन वर्षात बदललेले राज्यातील राजकारण, ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मिळालेले मुख्यमंत्री पद अशा राजकीय विषयांसह अनेक अराजकीय मुद्द्यांवरही यावेळी संवाद अपेक्षित आहे. यावेळी कला, सामाजिक, क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, वैद्यकीय, विधी आणि राजकीय अशी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मुलाखत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *