म्यानमार येथून आलेल्या गौतम बुद्धाच्या अवशेषांचे बौद्ध बांधवांनी घेतले दर्शन
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन समता सांस्कृतिक केंद्र अंतर्गत इंटरनॅशनल बुद्धीष्ट पीस ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आले होते. यानिमित्तानेम्यानमार येथून आलेल्या गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थींचे हजारो बौद्ध बांधवांनी दर्शन घेत मंगल मैत्रीचा संकल्प केला. शनिवार ९ फेबृवारी रोजी दु. ४ वाजता सम्यक संबुध्द तथागत भगवान बुद्ध यांच्या म्यानमार येथून आणलेल्या पवित्र अस्थी व थायलंड येथून आणलेल्या साडेसहा फूट उंचीची बुध्द मुर्तीच्या मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक बारावे गाव येथील श्रावस्ती बुध्द विहार येथून सुरू होऊन माधवसृष्टी, वसंत व्हॅली चौक, गणपती चौक, निक्की नगर, आधारवाडी जेल रोड, आधारवाडी चौक, फडके मैदान, लाल चौकी या मार्गाने पश्चीमेतून काढण्यात आली. पंचशील ध्वज हाती घेऊन शुभृवस्त्रात धम्म बांधव मिरवणूकीत सहभागी झाले होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी बुध्द अस्थी धातूस वंदन करण्याकरिता फडके मैदान, लाल चौकी, येथे व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ९ वा. बुध्द वंदनेने परिषदेची सुरवात झाली. त्यानंतर बुध्द धातू पूजा, संघदान, अठ्ठपरिखार दान, भिख्खू संघ भोजन दान आदी कार्यक्रम पार पडले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय धम्म परिषद, धम्मावर संवाद, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव, भिख्खू संघ धम्म देसना आदी कार्यक्रम संपन्न झाले. साहित्यिक, विचारवंत, उपासक-उपासिका, धम्म बांधव, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मंगल मैत्रीचा संकल्प करीत ही परिषदयशस्वी केली. या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजक भंते आगाधम्मा थेरो व पत्रकार प्रदीप जगताप यांनी केले होते.
**