कल्याणकरांसाठीची अंतर्गत बससेवा पून्हा सुरू करा
कल्याण : केडीएमसी सेवेतील बसेस त्या शहराच्या बाहेर चालविल्या जातात. महापालिका क्षेत्रातील नागरीकांना त्याचा उपयोग होत नाही. रिक्षा चालक आणि खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. परिवहनच्या बसेस अगोदर सुरु होत्या, त्या बंद का केल्या असा जाब शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन व्यवस्थापकाला विचारला. त्वरीत महापालिकेच्या अंतर्गत परिवहन सेवा सुरु करुन प्रवासांना दिलासा द्यावा अन्यथा परिवहन कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा परिवहन व्यवस्थापनास दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिष्टमंडळाने प्रशासनास भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. या प्रसंगी महिला आघाडीच्या विजया पोटे, हर्षवर्धन पालांडे, अरविंद पोटे, रविंद्र कपोते, विजय काटकर, दत्तात्रय खंडागळे आदी उपस्थित होते. या संदर्भात जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, गणपती, नवरात्र सण पार पडले. सध्या शहरात कोणतीही बस सुरु नाही. सर्व बसेस पनवेल, भिवंडी, वाशी नवी मुंबई याठिकामी चालविल्या जातात. २०१७ साली चार ते पाच लाख उत्पन्न होते. तेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जातात. १४० बसेस पडून आहेत. २०० चालक वाहक आहेत. त्यापैकी केवळ ६० चालक वाहकांचा वापर केला जात आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना काय फूकटचा पगार द्यायचा का असा संताप ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला.
लोकांसाठी परिवहन सेवा मिळाली नाही तर कार्यालयास आम्ही टाळे ठोकू. पांढरा हत्ती पोसायचा का? लोकांच्या टॅक्समधून कर्मचा-यांचा पगार दिला जातो. त्यांना सेवा द्यायला नको का ? अनेक नागरिक कामानिमित्त कल्याणला येतात. सामान्य लोकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. त्यांनाही परिवहन बसेस उपलब्ध करुन दिली जात नाही या विषयी पदाधिका-यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या आगाराला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्या आगाराची दयनिय अवस्था करून ठेवलीय. त्याठिकाणी साफसफाई झाली नाही तर डेपो पेटवून देण्याचा इशारा शिवसेना पदाधिकारी रविंद्र कपोते यांनी प्रशासनाला दिला.
परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांना परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. त्यापासून ५ लाख रुपयांचे आहे.