तामिळनाडू : तमिळनाडूमधील नीलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. हे हेलिकॉप्टर राहुल गांधींना घेऊन केरळमधील वायनाडमध्ये निघालं होतं. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची अशाप्रकारे तपासणी केल्यानंतर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, नीलगिरीत उतरल्यानंतर फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. पण तपासात काहीही आढळलं नाही. केरळमधील वायनाडमध्ये ते जात होते. तिथे ते रोड शो आणि सभांसह अनेक निवडणूक प्रचारात सामील होण्यासाठी निघाले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमधून मोठा विजय मिळवला होता. राहुल गांधींचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) ॲनी राजा यांच्याशी होणार आहे, जे विरोधक INDIA गटाचे मित्र आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या केरळ युनिटचे प्रमुख के सुरेंद्रन आहेत. लोकसभेच्या २० जागा असलेल्या केरळमध्ये २६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये ३९ जागांसाठी १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.