आयएनएस कलवरी भारतीय नौदलात दाखल : पंतप्रधानांनी मुंबईत केले राष्ट्रार्पण 

मुंबई :  आयएनएस कलवरी ही पाणबुडी आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रर्पण केले. आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झाली असून, दहशतवादा विरोधात महत्वाची भूमिका बजावेल असेही मोदी म्हणाले.

मुंबईत माझगाव बंदरात झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोदी म्हणाले की, आजचा दिवस सव्वाशे कोटी भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असून या ऐतिहासिक क्षणांसाठी सर्व देशबांधवांचे अभिनंदन करतो. आयएनएस कलवरी म्हणजे “मेक इन इंडिया”चे  उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरी पाणबुडी म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या वेगाने वाढणाऱ्या धोरणात्मक भागिदारीचे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे. 21 वे शतक हे आशियाई देशांचे शतक मानले जाते. या शतकात, विकासाचा मार्ग हिंदी महासागराद्वारेच होणार हे निश्चित असून त्यामुळेच राष्ट्रीय धोरणांमध्ये हिंदी महासागराला विशेष स्थान आहे. हिंदी महासागरात जागतिक धोरणात्मक आणि आर्थिक हिताबाबत भारत पूर्णत:  सजग असून  त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदल, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका  बजावत असल्याचे मोदी म्हणाले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, आधुनिक काळात युध्द नीतीमध्ये, शक्तीशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पाणबुडया आपल्या राष्ट्राच्या शांततेसाठी आणि जरब ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जागतिक  शांततेच्या दृष्टिकोनातून  आयएनएस कलवरीचे  महत्व  आहे.   भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गंत आयएनएस कलवरी मुंबईतल्या माझगाव बंदरात बांधण्यात आली आहे. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी या पाणबुडीचे आरेखन केले आहे. स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!