नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्राबाबूंच्या आंध्रप्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या पदरी निराशा पडली आहे. याच मुद्द्यावरुन अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपताच महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. महाराष्ट्रावर अन्याय केल्याची महाविकास आघाडीच्या खासदारांची भावना आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणतीच मोठी तरतूद नाही. काँग्रेस, शिवसेन ठाकरे आणि शरद पवार गटाचे खासदार आंदोलनात सहभागी झाले आहे.
काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी म्हटलं की, महाराष्ट्राला भोपाळा मिळाला आहे. बिहार, आंध्र प्रदेशला मोठ्या योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांसाठी 2014 ला दिलेली घोषणाच पुन्हा पाहायला मिळाली. खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मला अपेक्षा होती की महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली जाईल. पण दुर्देवानं कोणतेही घोषणा झाली नाही. लाडका मित्र घोषणा भाजपनं राबविली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली त्यांनी महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काय दिलंय हे सांगावे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं की, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना देखील काहीच मिळालं नाही. ज्यांच्यामुळे केंद्रात सरकार आलं आहे त्यांच्यावर जास्त लक्ष दिल्याच दिसून येतंय. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अपेक्षा होत्या. याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत दिसेल.
***