ठाणे ( प्रतिनिधी ) : एकिकडे देशभरात स्वातंत्रयाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत, मात्र दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानअंतर्गत येऊर ठाणे येथील आदिवासी समाज विजेसारख्या मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. यातूनच ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीची बेफिकीरी दिसून येते. मात्र आदिवासींच्या जीवनमान प्रकाशमान करण्यासाठी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेत वीज अधिका-यांच्या उपस्थितीत वीज हक्क जागरण बैठकीचे आयोजन केले होते.
येऊर ठाणे येथील आदिवासी समाज विजेसारख्या मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. संसाधनांची कमतरता असूनही आदिवासी आपला जीवनस्तर उंचावण्यासाठी धडपड करत आहे. आदिवासींच्या विकासामध्ये प्रमुख अडसर आहे तो म्हणजे विजेची कमतरता. वीज नसल्याने अनेक प्रकारच्या अपघातांना त्यांना सामोरे जावे लागते, आदिवासी मुलांच्या शिक्षणाला मर्यादा येत असल्याने त्यांची प्रगती खुंटलीय. आदिवासी समाजाची विजेची गरज ही शहरातील आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या वर्गाप्रमाणे उपभोगाची नसून उपयोगाची आहे. आज स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ७५ वर्षांनी सुद्धा प्रगत ठाणे शहराला खेटून असलेल्या आदिवासी पाड्यांत वीज नाही ही माणुसकीच्या तसेच लोकशाहीच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक रोहित जोशी यांनी व्यक्त केलीय.
आदिवासी समाजाला वीज पुरवठ्यापासून यापुढे वंचित रहावे लागू नये याकरिता अधिकृत रित्या विज ग्राहक बनण्याची कायदेशीर प्रक्रिया नक्की काय असते यासाठी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे बुधवारी वनीचा पाडा, जांभूळपाडा, पाटोणापाडा येथील केवळ आदिवासी ग्रामस्थांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीज जोडणी घेण्यासाठी इच्छूक आदिवासी कुटुंबाना महावितरण कंपनीचे धनाजी पुकाळे, ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या डॉ. चेतना दीक्षित, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक रोहित जोशी, आदिवासींच्या हक्कासाठी लढा देणारे जयराम राऊत काका, रमेश वळवी, रवी निमले, विकास बरफ यांनी मार्गदर्शन केले. *महिन्याभराच्या कालावधीत येथील आदिवासी पाड्यात वीज पोचविण्याबद्दल महावितरण तर्फे जाहीर करण्यात आले. त्यामुळे लवकरच आदिवासी पाडे अंधारमुक्त होणार आहेत.