ठाणे : सदनिकेची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी कोकण खंडपीठाने ठाणे येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील जन माहिती अधिकारी रवींद्र पाटील यांना १५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून तीन मासिक हप्त्यातून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ के. एल. बिश्नोई यांनी हा आदेश दिला आहे
वागळे इस्टेट परिसरातील श्रीनगर येथे गॅब्रीयर एम्प्लाइज कौ. ऑप.हौसिंग सोसायटीत प्लॉट क्रमांक बी २९ येथे सत्यवान राऊत राहतात. त्यांच्या सदनिकेबाबत माहितीसाठी त्यांनी सोसायटीकडे पाठपुरावा केला. मात्र सोसायटीच्या सदस्यांकडून त्यांना माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांनी स्वतः च्या सदनिकेच्या माहितीसाठी ठाणे येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी रवींद्र पाटील यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सदनिकेबाबतच्या माहितीसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांना जनमाहिती अधिकारी विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अखेर त्यांनी कोकण खंडपीठाकडे धाव घेतली. कोकण खंडपीठाच्या आदेशानंतरही पाटील यांनी माहिती दिली नाही. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के.एल. बिशनोई यांनी जन माहिती अधिकारी रवींद्र पाटील यांना १५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून तीन मासिक हप्त्यातून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राऊत यांना लवकरात लवकर त्यांच्या सदनिकेबाबतची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही संबंधित विभागाला दिले आहेत.
————–