मुंबई : एकिकडे कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडणार आहे. काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. घरगुती, गॅस, पेट्रोल डिझेलच्या वाढीमुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाल्याने यंदाच्या दिवाळीत महागाईमुळे सर्वसामान्यांचे दिवाळं निघणार आहे.

मागील वर्षी दिवाळीवर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे दिवाळीत फारसा उत्साह जाणवला नाही. यंदा कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने आणि राज्य सरकारकडून हळू हळू शिथिलतार आणत आता दुकान मॉल नाटयगृह सर्वच खुलं केल्याने दिवाळीसाठी उत्साहासाचे वातावरण आहे. एकिकडे कोरोनामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे दिवाळीत मोठा फटका सहन करावा लागणार आहे. डाळ, तेल, साखर या सर्वच जिन्नसांच्या किंमती वाढल्यामुळे तयार फराळाच्या किंमतीत वाढ होणार असल्याने मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. तयार फराळ घेणा-यांसाठी संख्या मोठया प्रमाणात असते त्यामुळे त्यांनाही महागाईचा फटका बसणार आहे. भाजणी चकली – ५०० रुपये किलो, शंकरपाळे – ३५० ते ४०० रुपये किलो, साधी शेव- २५० ते ३०० रुपये, चिवडा – ३५० ते ४०० रुपये किलो असे दर आहेत. तसेच दिवाळीत नवी कपडे खरेदी केली जाते मागील वर्षी कोरोनामुळे दुकानदारांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता, वर्षभरानंतर दुकानं खुली झाली आहेत त्यामुळ यंदा कपडयांच्या किंमतीत वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत त्यामुळे महागाईला तोंड कसं देणार ? कसं जगणार असा सवाल सर्वसमान्य नागरिकांना सतावत आहे.

भाज्या, अन्नधान्याचे भाव कडाडले …
मालवाहतुकीसाठी विशेषतः शेतमालाची ने-आण करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे त्याचा परिणाम भाज्या आणि अन्नधान्यांच्या किंमतीच्या वाढीवर झाला आहे. साहजिकच, भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. कोथिंबीर ६० ते ८० रुपये जुडी, टोमॅटो ६० ते ८० रुपये किलो, कांदे ५० ते ६० रुपये किलो, तूरडाळ १३० ते १४० रुपये किलो, तेल १५० ते २०० रूपये लीटर पर्यंत दर पोहचले आहेत. त्यामुळे भाज्या आणि अन्नधान्याचे भाव कडाडल्याने सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *