मुंबई : भारताने लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडला. १६ जानेवारीला लसीचा पहिला डोस देण्यात आला त्यानंतर तब्बल २७८ दिवसांनी भारताने हा टप्पा ओलांडला आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाची संथगतीने दिसून येतय. देशस्तरावर १०० कोटी लसीकरण झालं, यात महाराष्ट्राचा वाटा साडेनऊ कोटी आहे.
लसीकरणाचा आकडा १०० कोटी डोसेसपर्यंत पोहोचला असला तरी लशीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या ३० कोटी आहे. तर ७० कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे. भारतात आतापर्यंत ३.४ कोटी लोकांना कोव्हिडची लागण झाली आहे. आणि ४ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून भारताने एक विक्रम रचला आहे.
राज्यात आतापर्यंत ७० टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर दोन्ही डोस दिलेल्यांची संख्या ३५ टक्के इतकी आहे. उत्तर प्रदेशला अधिक लस उपलब्ध करून दिल्यानं तिथं सर्वाधिक लसीकरण झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन ..
पंतप्रधान मोदींनी १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर ट्वीट करून लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. “भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
इतर देश कुठे …
चीनमध्ये जून महिन्यातच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आलाय. त्यानंतर भारत हा दुस-या क्रमांकावर आला आहे. भारतापाठोपाठ युरोप ८३ कोटी, उत्तर अमेरिका ६६ कोटी, दक्षिण अमेरिका ४८१ कोटी, आफ्रिका १७६ कोटी तसेच ओशिनियात ४१ कोटींचे लसीकरण करण्यात आले आहे.