भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SKDCL) यांनी गुरूवारी सामंजस्य करार : खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश !
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या ३५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुर्गाडी किल्ला, कल्याण येथे स्मारक स्वरूपात भारतीय नौदलाची युद्धनौका T-80 विराजमान करण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SKDCL) यांनी गुरूवारी सामंजस्य करार केला. T-80 स्मारक हे आता SKDCL च्या नदी किनारा विकास प्रकल्पातील आरमार स्मारकाचा भाग असेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय किनारपट्टीचे परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी कल्याण येथे मराठा आरमाराची स्थापना केली. या घटनेचा सार्थ अभिमान पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहावा,यासाठी कल्याणच्या उल्हास नदीकिनारी आरमार स्मारकाच्या रूपात पुरातन असा वारसा आवार उभारण्याची कल्पना कल्याणचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या विचारमंथनातून निघाली. कल्याणचा प्राचीन इतिहास आणि नाविक वारशाला साजेसं एक पर्यटन स्थळ निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यानंतर या प्रकल्पाची धुरा नवनिर्वाचित आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे आली, आणि प्रकल्प पूर्ण करण्याचे अत्यंत कठीण काम त्यांनी जोमाने हाती घेतले आहे.
लवकरच प्रेक्षकांसाठी निर्माण होणारे हे आरमार स्मारक प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास दर्शवेल.तसेच कायमस्वरूपी सार्वजनिक प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृती आणि मल्टिमिडीयाच्या रूपात मांडले जातील. नियोजनाच्या टप्प्यापासूनच हा प्रकल्प भारतीय नौदलातील अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागासह विकसित केला गेला आहे. भारतीय नौदल आणि SKDCL यांच्यातील सहकार्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये अभ्यास दौरे, अभिलेखीय ऐतिहासिक सामग्रीची देवाणघेवाण आणि आता खुद्द T-80 युद्धनौकेचे कायमस्वरूपी प्रदर्शन यांचा समावेश आहे.
इंडियन नेव्हल फास्ट अटॅक क्राफ्ट (Ex T-80) ही युद्धनौका २४ जून १९९८ रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित झाली होती. हे जहाज विशेषतः उथळ पाण्याच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले होते आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्यात ही युद्धनौका कायम तत्पर राहिली.
या सामंजस्य करारासाठी, भारतीय नौदलाचे मुख्यालय महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे अधिकारी कमोडोर जिलेट कोशी, कमांडर अभिषेक कारभारी, कॅप्टन पी के मन्ना, लेफ्टनंट अरुण कुमार, लेफ्टनंट सोम प्रकाश आणि लेफ्टनंट अर्जुन पंडित यांनी प्रतिनिधित्व केले. SKDCL चे प्रतिनिधित्व प्रल्हाद रोडे – मुख्य कार्यकारी अधिकारी SKDCL तरुण जुनेजा – कार्यकारी अभियंता स्मार्ट सिटी प्रकल्प आणि सचिन सावंत – हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार यांनी केले. या सामंजस्य करारामुळे भारतीय नौदलाचा कल्याण-डोंबिवलीच्या स्थानिक समाजाशी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध नौदल वारशाच्या इतिहासाशी संबंध कायमचा जोडला जाईल .