डोंबिवली : कल्याणच्या पूर्व भागात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी एका रात्रीत चोरट्यांंनी चार-पाच दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी रात्री चोरट्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी, तर डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्या. यामध्ये एका पत्रकाराच्या दुकानाचे लोखंडी शटर तोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज चोरून नेला. काही ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्यांचा पोलिस माग काढत असून लवकरच चोरटे हाती लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार सुभाष विश्राम कदम (54) हे कल्याण पूर्वेतील दुर्गा माता मंदिर परिसरात राहतात. त्यांचे कोळसेवाडी शिवसेना शाखेसमोरील साईनाथ भवन इमारतीत एका गाळ्यात अन्नपूर्णा नावाने दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी दुकान उघडून रात्री दहा वाजता दुकान बंद करतात. बुधवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दुकानात ग्राहक सामान विक्रीतून मिळालेले एक लाख पाच हजार रूपये गल्ल्यात होते. चोरट्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या कदम यांच्या दुकानाचे शटर धारदार हत्याराने तोडून दुकानात प्रवेश केला. सामानाची फेकाफेक करून दुकानातील कुलुप बंद असलेला गल्ला तोडून चोरट्यांनी त्यातील एक लाख रूपयांची रोख रक्कम आणि काही सुट्टे पैसे चोरून नेले. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कदम दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानाचे शटर तोडल्याचे आढळून आले. दुकानात सामानाची फेकाफेक केली होती. गल्ल्याचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली होती. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पत्रकार सुभाष कदम यांनी तक्रार दाखल केली आहे.

ही घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावातील कंत्राटदार अखिलेश चव्हाण यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ठाकुर्ली जवळच्या चोळेगावातील रहिवासी राजकुमार यादव यांची 90 फुटी रस्त्यावर उभी करून ठेवलेली रिक्षा चोरट्यांनी मंंगळवारी रात्री चोरून नेली. रामनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तसेच पाणेरी कपडा दुकान, केअर मेडिकल दुकान, अमृत पॅलेस बारमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. या फुटेजच्या साह्याने स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचचे कल्याण युनिट चोरट्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे चोरटे लवकरच हाती लागण्याची चिन्हे आहेत.
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!