दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी काळजी घेण्याचे डॉक्टरांकडून आवाहन
कल्याण : कल्याण डोंबिवलीच्या हवेमध्ये काही दिवसांपासून बिघाड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून, एक्यूआय इंडेक्सने (air quality index) 200 ची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. त्यामुळे दमा किंवा श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरे अतिशय दाटीवाटीच्या लोकवस्तीची शहरे आहेत. याठिकाणी लोकांप्रमाणेच वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. त्यातच पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्यापही पूर्णपणे भरण्यात आलेले नसल्याने धुळीचा त्रास अद्यापही कायमच आहे. एकीकडे धुळीचा त्रास तर दुसरीकडे वाहनांचे प्रदूषण याचा परिणाम थेट हवेच्या गुणवत्तेवर झाला असून कल्याणात 202 तर डोंबिवली परिसरात एक्युआयची पातळी त्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 250 वर पोहोचली आहे. या आकडेवारीवरूनच इथल्या वायू प्रदुषणाचा अंदाज येऊ शकतो.
pm10 आणि pm2.5 हे घटक प्रदूषण वाढीस जबाबदार…
ज्यातही pm10 (particulate matter) आणि pm2.5 हे दोन घटक वायू प्रदूषण वाढवण्यास जबाबदार ठरले आहेत. धूळ आणि गाड्यांचे प्रदूषण यामुळे हे दोन्ही घटक वाढण्यास कारणीभूत ठरतात. pm10 म्हणजे 10 मायक्रोमीटरपेक्षा सूक्ष्म कण आणि pm2.5 म्हणजे अडीच मायक्रो मीटरपेक्षा छोटे असे अतिसूक्ष्म कण. उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या केसाचा आकार साधारणता: हा 100 मायक्रोमीटर असतो. यावरूनच हे धूलीकण किती अतिसूक्ष्म आहेत हे आपल्या लक्षात येईल. हे अतिसूक्ष्म धूलीकण श्वसनाद्वारे आपल्या श्वसन नलिकांत जाऊन बसतात आणि त्यामुळे मग आपल्याला सर्दी, खोकला किंवा इतर श्वसनाचे आजार जडतात अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून देण्यात आली.
वाढत्या प्रदुषणाचा सर्वानाच त्रास, त्यामुळे काळजी घ्या – डॉ. गुरुदत्त भट, बालरोग तज्ञ
कल्याण डोंबिवलीतील प्रदूषण पातळी 200 पार म्हणजे अतिशय धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. ज्याचा त्रास केवळ लहान मुलांनाच नाही तर प्रौढ नागरिक आणि ज्येष्ठांनाही जाणवत आहे. इतक्या मोठ्या वायू प्रदूषण पातळीमुळे सर्दी, खोकला, दम्याचे त्रास अशा आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यासाठी मास्क वापरणे हा कायमस्वरुपी उपाय नसला तरी मास्कमुळे काही प्रमाणात हे धुलीकण आपल्या शरीरात जाण्यास मज्जाव होत आहे. रस्त्यांवरील धूळ आणि गाड्यांचे प्रदूषण हे दोन्ही घटक तातडीने नियंत्रित करणे आवश्यक बनले आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. गुरुदत्त भट यांनी व्यक्त केली.