मुंबई : मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर गुरूवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. करचुकवेगिरी केल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचे बोलले जाते. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी शर्मा यांना अटक करण्यात आली होती.
माजी आमदार आणि खासदार रमेश दुबे यांच्याशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. माजी आमदारावर मोठ्या प्रमाणात करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. शर्मा हे काही राजकारणी आणि उद्योजकांसोबत जोडलेले आहेत, त्यांचीही करचुकवेगिरीप्रकरणी चौकशी सुरू आहे.सगळी मालमत्तेची पडताळणी केली गेली त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का याचा तपास आयकर विभाग करत आहे.
माजी खासदाराच्या घराचीही झडती
शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी माजी खासदार रमेश दुबे आणि त्यांच्या बांधकाम व्यावसायिक मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आयएएसच्या घरावरही छापा
एका माजी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आयएएस अधिकाऱ्याने मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. मराठा आंदोलनाच्या दोन्ही टप्प्यात याच अधिकाऱ्याने जरंगेच्या मराठा आंदोलनाला निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच्या घरातून आयटी पथकाने अनेक महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये पैसा, सोने-चांदी व्यतिरिक्त काही कागदपत्रांचाही समावेश आहे. मात्र, त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
25 फेब्रुवारी 2021 रोजी जिलेटिनने भरलेली एक चारचाकी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ सापडली होती. त्यानंतर ५ मार्च रोजी या चारचाकीचा मालक मनसुख हिरेनचां ठाण्याच्या खाडीत मृतदेह मिळाला. या प्रकरणी एनआयएने तपास केला. तपासादरम्यान जून २०२१ मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचाही हात असल्याचं समोर आलं होतं.