मुंबई : ठाण्यात वर्षभरात वृक्ष कोसळण्याच्या पोचशेहून अधिक घटना घडतात यामध्ये अनेक नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. वृक्ष कोसळण्याच्या घटनांत ठाणे महापालिकेकडून अक्ष्म्य कारभार कारणीभूत असून या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना नोकरी मिळावी आणि जखमींना उपचारासाठी आर्थिक खर्च देण्यात यावा यासाठी ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते व पीडितांनी मुंबई उच्च न्यायालात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमुर्ती नितीन जामदार यांच्यासमोर झालेल्या प्रथम सुनावणीत स्व अर्पिता वालावलकर यांचा मुलगा व याचिकाकर्ता प्रतिक वालावलकर याच्या नोकरीच्यासंदर्भात आणि वृक्ष कोसळून जखमी झालेल्या अमोल रांधावे यांच्या उपचाराचा आर्थिक खर्च देण्याच्या विनंती अर्जावर दोन आठवडयात विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश हायकोर्टाने ठाणे महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते व याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली.

ठाण्यातील वृक्ष कालबद्ध नियोजनाद्वारे काँक्रिट मुक्त करावेत तसेच पीडितांना योग्य मोबदला व शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणे पालिकेच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी सुयोग्य धोरण बनवावे जखमींना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी या प्रमुख व इतर मागण्यांकरिता ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी व अन्य पीडित याचिका कर्त्यानी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मागील वर्षी गणेशोत्सवादरम्यान कोलबड येथे एक पिंपळवृक्ष मंडपावर कोसळून झालेल्या अपघातात अर्पिता वालावलकर या महिलेचा मृत्यू झाला होता. यावेळी वृक्ष प्राधिकरणाचा अक्षम्य हलगर्जीपणा उघडकीस आला. सृष्टी गृहनिर्माण संस्थेने धोकादायक झाड हटवण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे चार वेळा विनंती अर्ज केल्यानंतरही वृक्ष तोडीची परवानगी देण्यात आली. त्यावर सदर वृक्ष तोडण्याचा अनुभव अथवा साधने आमच्याकडे नाहीत त्यासाठी ठामपा ने मदत करावी असे अर्जव गृहनिर्माण संस्थेने केले होते. त्याकडे कानाडोळा केल्यानेच हा वृक्ष कोसळला आणि अर्पिता वालावलकर यांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. मात्र ठाणे महापालिकेकडून वालावलकर यांच्या कुटूंबास तसेच इतर जखमींना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे स्व. अर्पिता वालावलकर यांचा मुलगा व प्रतिक वालावकर यांनी याचिका दाखल केली आहे. प्रतिक हा पर्यावरण शास्त्रात पदवीधर आहे.

तसेच २०१८ साली वृक्ष कोसळल्याने अॅडव्होकेट किशोर पवार या तरूणाचा मृत्यू झाला होता. धेाकादायक अवस्थेत असलेला हा वृक्ष हटवण्यासाठी एका गृहनिर्माण संस्थेने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज करून देखील त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. पालिकेच्या अनास्थेचा किशोर हा बळी ठरला. पवार कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती हकनाक मृत्युमुखी पडला. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही इतर साधन नसल्याने स्व. किशोर पवार यांचा संसार उघड्यावर आला. त्यांच्या शिक्षित पत्नीला ठाणे महानगरपालिकेने कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे लावून धरण्यात आली होती. व्यापक जन आंदोलनानंतर तत्कालीन महासभेने ठराव करून कै. किशोरच्या पत्नी प्रीती पवार यांना नोकरीत सामावून घेतले. परंतु धक्कादायक बाब म्हणजे आजतागायत त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती न करता त्यांना कंत्राटी पद्धतीने या विभागातून त्या विभागात बदली करून अन्यायपूर्वक वागणूक देण्यात येत आहे असेही जोशी यांनी सांगितले.

ठाण्यात वर्षभर वृक्ष कोसळण्याचा घटना वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यात शंभरच्या आसपास वृक्ष कोसळल्याची माहिती आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाचशेहून अधिक वृक्ष धारातीर्थी पडतात अशी बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. वृक्ष पडझडीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होते आहे. वृक्ष कोसळण्यापाठी ठामपा वृक्ष प्राधिकरणाचा अक्षम्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. २०१५ पासून राष्ट्रीय हरित प्राधिकरण व अन्य न्यायालयांनी वृक्ष काँक्रिट मुक्त करण्याचे वारंवार सूचना देऊनही ठाणे महानगरपालिका त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत उदासीन आहे अशी नाराजी रोहित जोशी यांनी व्यक्त केली.

https://twitter.com/cjournalist4/status/1666438195498631171?t=sxczmNKOxM80r9p3RMxang&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *