नवी दिल्‍ली, 5 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथालय महोत्सव 2023 च्या उद्घाटनाप्रसंगी आज केले.

राजधानीतील प्रगती मैदान येथे हॉल क्रमांक 5 येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ′′ग्रंथालय महोत्सव 2023′′ चे आयोजन करण्यात आले आहे. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. अनामिका उपस्थित होत्या. तसेच सर्व राज्यांचे शासकीय ग्रंथालय प्रतिनिधींसमवेत महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालक डॉ. दत्तात्रय क्षीरसागर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि भविष्यातील दरी ही सांधतात. ग्रंथालयांच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्रंथालये हा विकासाप्रती मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग म्हणून तसेच ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “ग्रंथालय महोत्सव 2023” चे दोन दिवसीय आयोजन केले आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, ग्रंथालये ही सामाजिक संवादाची, अभ्यासाची आणि चिंतनाची केंद्रे बनली पाहिजेत. ग्रंथालये एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या सामूहिक चेतनेचे आणि बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक देशांतील लोकांनी भारतातून पुस्तके नेऊन त्यातून ज्ञान मिळवले. पुस्तके आणि ग्रंथालये हा मानवतेचा समान वारसा आहेत. एका छोट्या पुस्तकात जगाच्या इतिहासाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, की जॉन रस्किन यांच्या ‘अन टू द लास्ट’ या पुस्तकाचा गांधीजींच्या जीवनावर मोठा सकारात्मक प्रभाव पडला आहे.

  राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, हस्तलिखितांचे संवर्धन आणि ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशनसाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वापराने ग्रंथालयांचे स्वरूप बदलत आहे. 'वन नेशन- वन डिजिटल लायब्ररी' हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.  नॅशनल मिशन ऑन लायब्ररीच्या यशामुळे ग्रंथालयांशी जोडण्याची आणि पुस्तके वाचण्याची संस्कृती बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा महोत्सव 'आझादी का अमृत महोत्सवा'च्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग आहे. ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी सुसंगत आहे, असेही त्यांनी सांगितले.

महोत्सवात प्रदर्शने, पुस्तकांची दालने

लेखक सत्र, मुलांसाठी कार्यशाळा, मुलांसाठी गॅलरी आणि ग्रंथालयांच्या डिजिटलायझेशनवर गटचर्चा, सत्रांचा समावेश असेल. ज्ञानाचा उत्सव साजरा करणे, इतिहास आणि भविष्यातील अंतर कमी करणे आणि वाचनाची आवड वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. ग्रंथालय महोत्सव 2023’ या महोत्सवाच्या समारोप समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित राहतील. देशातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळखही यावेळी करून देण्यात येणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!