डोंबिवली: कमी अवधित जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण डोंबिवली करांना देखील खेळता यावा आणि येणाऱ्या ऑलिंपिक मध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने डावखर फाउंडेशन आणि रिजन्सी ग्रुप यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट चार पॅवेलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी रीजन्सी ग्रुपचे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रूपचंदाणी, दिनेश कुमार बासोरिया उपस्थित होते. तसेच माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि माजी नगरसेवक सचिन पोटे देखील उपस्थित होते. आजची जीवनशैली पाहता निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी पिकल बॉल हा खेळ आवर्जून खेळला जातो.
उदघाटनाच्या दिवशी डावखर कप 2023 च आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड मधून खेळाडू या ठिकाणी टूर्नामेंट साठी आले होते. डावखर कप 2023 मध्ये एकूण एक लाख 25 हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि मेडल विजेत्या स्पर्धकाला देण्यात आले.
ओपन मेन्स सिंगल मध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन गौरव राणे हिमांश मेहता, ओपन मेन्स डबल मध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि 35 प्लस मेन्स डबल मध्ये अनुक्रमे मिहीर हिमांशु, वैभव विकी, संदीप शैलेश यांना प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळाले.
सानिया मिरझा विरुद्ध टेनिस खेळणारी नॅशनल खेळाडू ईशा लखानी व हिमांश मेहता आणि नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू हे देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.
भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक वयोगटात हा खेळला जाणार असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयर च्या युएस चॅम्पियनशिप चा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी दिली आहे.
जलद गतीने वाढणारा खेळ म्हणून पिकल बॉल या खेळाकडे सध्या बघितले जाते. बॅडमिंटन आणि टेनिस या खेळांचे कॉम्बिनेशन म्हणजे पिकल बॉल. वॉशिंग्टन राज्याचा प्रमुख खेळ म्हणून पिकल बॉल या खेळाला मान्यता मिळालेली आहे. या खेळाचा आता जगभर प्रसार होत आहे. पण या खेळाची सुरुवात 1965 साली अमेरिकेपासून झाली होती. अमेरिकेतले खेळाडू, कलाकार, राजकारणी सर्व हा खेळ आवर्जून खेळतात. फिट राहण्यासाठी आवर्जून पिकल बॉल हा खेळ खेळला जातो. कोणत्याही प्रकारची दुखापत या खेळामध्ये कधीही होत नाही. कोणतीही वयोमर्यादा नाही. प्लास्टिक बॉल, लाकडी पेडल चा वापर या खेळासाठी केला जातो. 11, 15 किंवा 21 पॉईंट पर्यंत या खेळात खेळता येते. जगभर खेळाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दोन वर्षात ऑलिंपिक मध्ये देखील या खेळाचा समावेश होणार आहे.
एशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियम उद्घाटनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. संतोष डावखर आणि टीमने विशेष मेहनत घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी केला.