मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातील ऑक्सीजन प्रकल्पाचे लोकार्पण

ठाणे, दि.३१ : राज्य सरकार हे कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका असतानाही आम्हाला यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, हे कशाला जनतेचा जीव धोक्यात घालायला का ? असा सवाल करीत ठाकरे यांनी आंदोलन करण्याची ज्यांना खुमखुमी असेल त्यांनी कोरोना विरोधात आंदोलन करा, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार सरनाईक यांच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी मीरा भाईंदर येथे पहिल्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. मात्र कोरोना निर्बंधासाठीचे नियम मोडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करायचेच असेल तर कोरोना विरुद्ध करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या आमदार सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत तसे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सरनाईक यांचे अभिनंदन केले.

तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना निर्बंधाचे पालन करा- पालकमंत्री एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री शिंदे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वांधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्हा नियोजन विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरातील महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होईल. सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे सांगत संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोना लढाईतील ठाणेकरांच काम मार्गदर्शक- खासदार संजय राऊत

खासदार राऊत यावेळी म्हणाले, जे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्याप्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार श्री. सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

ऑक्सिजन प्रकल्पाविषयी
आमदार सरनाईक यांनी आपल्या ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असून त्या दिवशी उत्सवाचे मोठे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला जाणार आहे.

प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने – ठाणे शहरात, रेमंड कंपनी समोर, विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून आपल्या शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या प्लांटमधून १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

हा ऑक्सिजन प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!