मुंबई, दि. 25 : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबीर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.

केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही, तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यास सांगितले. पूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यात जेथे आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असले तरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार राजू पाटील,विश्वनाथ भोईर,रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे, महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी , स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.


डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुस-या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिस-या मजल्यावरती 5000 स्के.फीट च्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरीता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरीता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणावरहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर ,50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कोविड आरोग्य केंद्र कल्याण

कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84नार्मल बेड ,10सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटर मध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील

कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा

कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *